'महाविकास' नाही तर महा'कन्फ्युज' आघाडी; एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:18 IST2025-10-16T12:18:07+5:302025-10-16T12:18:56+5:30
सर्वजण एकत्र येऊनही त्यांना पराभवाची चाहूल

'महाविकास' नाही तर महा'कन्फ्युज' आघाडी; एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र
सातारा : महाविकास आघाडीत सर्वजण एकत्र आले म्हणून निवडणूक जिंकण्याचा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. पण, ते निवडणुका पुढे ढकला म्हणतात. त्यांना पराभवाची चाहूल लागलेली आहे. महायुती जिंकणार म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नाही, तर ती महा‘कन्फ्यूज’ आघाडी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.
सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुती पूर्ण ताकदीने उतरली आहे. आताच्या निवडणुकीतही आमच्या लाडक्या बहिणी विरोधकांना चारीमुंड्या चीत करतील. विधानसभा निवडणुकीतही लाडक्या बहिणी, भाऊ आणि शेतकऱ्यांनी त्यांना विरोधी पक्षनेता बनण्याइतपतही संख्याबळ दिलं नाही. यावरून त्यांची मानसिकता खचली आहे. निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही हेच दिसत आहे.
विरोधकांनी आत्मचिंतन करावे...
ते निवडणुका जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग चांगला, आक्षेप नाही. पण, पराभव झाला की दोष द्यायचा. खरेतर ईव्हीएम मशीनची प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळातच सुरू झाली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा हुकूमशाही पाहिली आहे. अधिकाऱ्यांना मारणं, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जेवण करताना अटक करणं, अभिनेत्री कंगना राणावत यांचं घर तोडणं ही हुकूमशाही त्यांनी दाखवलीय. लोकसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी जेलमध्ये टाकणार अशी वक्तव्येही केली. ही कसली लोकशाही होती. त्यामुळे विचारपूर्वक बोललं पाहिजे. यासाठी विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला शिंदे यांनी दिला.
बैठकीसाठी अधिकारी ताटकळत...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विकासकामांची आढावा बैठक होणार होती. यासाठी दुपारी तीनपासूनच अधिकारी नियोजन भवनमध्ये उपस्थित होते. पण, उपमुख्यमंत्री शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेच नाहीत. नंतर अधिकाऱ्यांना बैठक होणार नसल्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे अधिकारी निघून गेले. पण, दोन तास त्यांना ताटकळत वाट पहावी, लागल्याची चर्चा होती.