कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 05:58 IST2025-09-01T05:55:51+5:302025-09-01T05:58:33+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगे पाटलांनी दीड तास चर्चा केली. कुणबी नोंदी संदर्भातील अभ्यासकांनी दिलेले पुरावे शिंदे समितीला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हैद्राबाद गॅझेट व सातारा संस्थानातील जुन्या कुणबी नोंदीच्या अनुषंगाने शिंदे समितीसोबत चर्चेसाठी आवश्यक मुद्दे सुचवण्यासाठी मराठा अभ्यासकांनी भेटीस येण्याचे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी केले होते. त्यानुसार रविवारी भेटीस आलेल्या मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत त्यांनी दीड तास चर्चा केली. कुणबी नोंदी संदर्भातील अभ्यासकांनी दिलेले पुरावे शिंदे समितीला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, अशी माहिती डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी दिली.
मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे (सांगली), डॉ. शिवानंद भानुसे (संभाजी नगर), हैदराबाद गॅझेटचे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी (संभाजी नगर), अॅड. प्रणित डिकले (धाराशिव), दीपक कदम (हिंगोली), योगेश केदार (धाराशिव), सातारा गॅझेट व मोडी लिपीच्या अभ्यासक डॉ. कांचन कोठावळे जाधव, डॉ. राजेंद्र कोंढरे यांनी जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भेट घेतली. यावेळी अभ्यासकांनी विविध मुद्द्यावर आपली मते मांडली. तर, शिंदे समितीचे सदस्य जरांगे पाटील यांच्या भेटीला येण्याची शक्यता असल्याने बराच वेळ अभ्यासक आंदोलन स्थळी बसून होते.
महंत शिवाजी यांचे घेतले आशीर्वाद
दरम्यान, तिसऱ्या दिवशी भेटीसाठी आलेल्या नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या पाया पडून पाटलांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धवसेनेचे आमदार दिलीप सोपल, आ. कैलास पाटील, समाजवादी पार्टीचे आ. अबू आझमी, शिंदेसेनेचे आ. विलास भुमरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. राजू नवघरे यांनी भेट घेतली.
एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार
२९ तारखेपासून आझाद मैदानावर पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. आम्ही सर्व आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी, असेही आ. विलास भुमरे म्हणाले.
कुणालाही पैसे न देण्याची ताकीद
ग्रामीण भागातून आलेल्यांसाठी अन्नछत्र सुरू केले. मात्र, जेवण, छत्री, रेनकोटच्या नावाखाली काही जणांनी धंदा सुरू केला आहे. मराठा समाजाच्या मदतीसाठी कुणी पैसे मागत असल्यास ते देऊ नका. लोकसभेत पैसे खाल्ले, आता समाजाच्या नावाने पैसे खात आहेत. जी इज्जत देत आहे ती सांभाळा, अन्यथा नाव पुराव्यासह जाहीर करेन, असा इशारा दिला.
आंदोलकांची दिशाभूल होत आहे
पोलिस कर्मचारी स्वयंसेवकांच्या वेशात जाऊन वाशी येथील आंदोलनकर्त्यांना परत गावाकडे जायचा जरांगे पाटलाचा निरोप असल्याचे खोटे सांगून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. हा प्रकार थांबवावा, अन्यथा आम्ही आमदार-खासदारांना महाराष्ट्राबाहेत पाठवू, असे जरांगे पाटील म्हणाले.
ठाकरे ब्रँड चांगला; पण राज मानाचे भुकेले
ठाकरे भावांचा ब्रँड चांगला आहे, असे राज्यातील समाजाचे मत आहे; पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे ब्रँडचे अस्तित्व खराब केले. लोकसभेत गेम करून, विधानसभेत मुलाचा पराभव करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची री ओढणारे राज हे मानाचे भुकेले आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केली.
चंद्रकांत पाटील, नितेश राणेंवरही हल्लाबोल
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मत्स्य आणि बंदरेमंत्री नितेश राणेंवरही त्यांनी हल्लाबोल केला. जरांगे पाटील म्हणाले, तुमचे निवडून दिलेले १३ आमदार पळून गेले. त्यानंतर मराठवाड्यात कधी आलात का? आम्ही कधी पुण्याला, नाशिकला का गेलात, ते कधी विचारले नाही. काही विचारले नसताना आम्हाला सल्ला का देता? हुशार राजकारणी असूनही विचारपूर्वक का वागत नाहीत? असा सवालही त्यांना केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मधल्या काळात चांगले काम केल्याने बोलत नव्हतो. मराठा उपसमितीचे अध्यक्ष असताना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून व्हॅलिडिटी रोखल्या, हे आम्हाला माहीत आहे. मराठा आरक्षणाविरोधात बोलून मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका. कोल्हापूर फार काही लांब नाही, अशी टीका केली, तर नितेश राणेंना आंदोलन संपल्यावर बघू, असा इशारा दिला.