साठीत नव्हे, तिशीतच येतोय बहिरेपणा ! समजून घ्या इअरफोनचा वापर कसा करावा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:56 IST2026-03-09T19:48:34+5:302026-03-09T19:56:14+5:30
Chandrapur : मोफत डिजिटल मनोरंजनाच्या नादात आजची पिढी नकळत निशब्धतेच्या गर्तेत ढकलली जात आहे. तासन्तास कानाला चिकटलेले मोबाईल आणि इअरफोन्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे श्रवणशक्तीचा हास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Deafness starts in your thirties, not in your sixties! Understand how to use earphones?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मोफत डिजिटल मनोरंजनाच्या नादात आजची पिढी नकळत निशब्धतेच्या गर्तेत ढकलली जात आहे. तासन्तास कानाला चिकटलेले मोबाईल आणि इअरफोन्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे श्रवणशक्तीचा हास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या ताज्या सर्वेक्षणाने राज्याची झोप उडवली आहे. गेल्या तीन वर्षात तब्बल १ लाख ६३,११४ जणांमध्ये श्रवणदोषाची गंभीर लक्षणे आढळली असून, हजारो जणांना शस्त्रक्रिया किंवा श्रवणयंत्रांचा आधार घ्यावा लागला आहे.
ध्वनीच्या या मायाजालात आपली ऐकण्याची क्षमता वाचवायची असेल, तर जास्त आवाजात इअरफोनने गाणे ऐकणे बंद करणे गरजेचे असल्याचा सल्ला कान नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अजय कांबळे यांनी दिला आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर मोठा धोकाही होऊ शकतो.
मोबाइल-इअरफोनचा अतिवापर; वाढते ध्वनिप्रदूषण
आजच्या धावपळीच्या युगात मोबाइल आणि इअरफोन अविभाज्य घटक बनले आहेत; मात्र कानाच्या पडद्यावर सतत पडणारा आवाजाचा मारा श्रवणतंतूंना कायमस्वरूपी इजा पोहोचवत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे रस्त्यांवरील हॉर्न आणि कारखान्यांचे प्रदूषणही यात भर टाकत आहे.
झोपतानाही चक्क कानात इअरफोन !
अनेक तरुणांना रात्री गाणी ऐकत किंवा चित्रपट पाहत झोपण्याची सवय लागली आहे. झोपेतही कानात इअरफोन अडकवलेले असल्याने कानांना विश्रांती मिळत नाही. यामुळे कानातून सतत शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे (टिनिटस) आणि झोपेचे विकार बळावत आहेत.
साठी नव्हे, तिशीतच गाठतोय बहिरेपणा
पूर्वी वयोमानानुसार साठीनंतर ऐकू येण्याचे प्रमाण कमी व्हायचे. मात्र, आता इअरफोनच्या अतिवापरामुळे विशी-तिशीतील तरुणांनाही मशीन लावण्याची वेळ येत आहे. राज्यातील १.६३ लाख रुग्णांपैकी मोठा वाटा हा तरुणांचा असणे ही धोक्याची घंटा आहे.
इअरफोनचा वापर कसा करावा ?
दिवसातून ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापर टाळावा, मोबाइलचा आवाज नेहमी ६० टक्क्यांच्या खालीच असावा.
ऐकण्याच्या क्षमतेवर हे दुष्परिणाम
कानात सतत जडपणा जाणवणे, मोठ्या आवाजाशिवाय शब्द स्पष्ट न समजणे, चिडचिड होणे आणि एकाग्रता कमी होणे, तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे.
९० डेसिबल आवाजाने कर्णबधिरता
सर्वसाधारणपणे ६० डेसिबलपर्यंतचा आवाज मानवी कानांसाठी सुरक्षित मानला जातो. मात्र, इअरफोनमधून आपण ८५ ते १०० डेसिबलपर्यंतचा आवाज ऐकतो. सतत २० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या संपर्कात राहिल्यास कानातील नाजूक पेशी मरतात.
ईएनटीच्या ओपीडीत रोज वाढतेय गर्दी
जिल्हा रुग्णालय आणि खासगी ईएनटी (नाक-कान-घसा) तज्ज्ञांच्या ओपीडीत सध्या श्रवणदोष असलेल्या रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. यात बहुतांश रुग्ण हे कानातून पू येणे, कमी ऐकू येणे किंवा कानात खाज सुटणे अशा तक्रारी घेऊन येत आहेत.
कानांची अशी घ्या काळजी
कानात तेल, काडी किंवा टोकदार वस्तू घालणे टाळा, शक्य असल्यास 'इअरफोन' ऐवजी 'हेडफोन' वापरा, कारण ते कानाच्या थेट संपर्कात नसतात, गोंगाटाच्या ठिकाणी इअर प्लगचा वापर करा, कोणतीही तक्रार जाणवल्यास घरगुती उपाय न करता तज्ज्ञांना दाखवा.