मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आझाद मैदानाची क्षमता संपली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि फोर्ट परिसरात आंदोलकांची गर्दी पाहायला मिळत आहे. परिणामी, शहराच्या दक्षिण मध्य भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मनोज जरांगे-पाटील हे हजारो किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत दाखल झाले असून, काही वेळातच ते आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू करतील. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधवही मुंबईत पोहोचले आहेत, ज्यामुळे आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात भगवे वादळ उसळले. आंदोलकांची मोठी संख्या पाहता, येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतुकीच्या मार्गांमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत.
मुंबईतील भायखळा परिसरात सकाळपासूनच वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाली. दरम्यान, पोलिसांनी जेजे फ्लायओव्हरवर आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना थांबवण्यात आले. त्याऐवजी त्यांना काफिले पुलाच्या खाली मोहम्मद अली रोडकडे वळवण्यात आले. वाहतूक पोलिसांनी आंदोलकांना वाहने वाडी बंदर येथील बीपीटी परिसरात पार्क करण्याचे निर्देश दिले.
मराठा मोर्चा आंदोलकांच्या गाड्यांमुळे शीव पनवेल मार्ग- मानखुर्द ते देवनार डेपो डाऊन डायरेक्शन वाहतूक कोंडी झालेली आहे, मोर्चा मधील गाड्या फ्री वे मार्गे आझाद मैदान कडे पाठवण्यात येत आहेत. तरीही नियमित वाहतूक मार्ग वि एन पुरव मार्गवर देखील खोलांबा आहे. मराठा मोर्चा साठी आलेल्या आंदोलकांच्या गाड्यांमुळे बॅरिस्टर नाथ पै मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे बसमार्ग ४६, ५० काळा चौकी येथे सकाळी सात वाजल्यापासून खंडित करण्यात आले आहेत, तसेच बसमार्ग ए ४२ आणि ए १३५ माझगाव येथे खंडित करण्यात आले.