क्रूझवर होणार सप्ततारांकित सप्तपदी

By Admin | Updated: March 17, 2017 02:43 IST2017-03-17T00:03:24+5:302017-03-17T02:43:32+5:30

दुबईचा एक भारतीय व्यावसायिक रिजवान साजन यानं स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी चक्क एक क्रूज बुक केलं आहे

The cruise will be on the Saptapadi | क्रूझवर होणार सप्ततारांकित सप्तपदी

क्रूझवर होणार सप्ततारांकित सप्तपदी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - जहाजावर लग्न तुम्ही कधी पाहिलं आहे. मात्र थांबा तुम्हाला लवकरच जहाजावर एका लग्नाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. दुबईचा एक भारतीय व्यावसायिक रिजवान साजन यानं स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी चक्क एक क्रूज बुक केलं आहे. विशेष म्हणजे या लग्नात 1000 पाहुणे सोयरे येणार असून, त्यात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचाही समावेश असणार आहे. हा विवाह सोहळा एका क्रूझवर इटली, स्पेन आणि फ्रान्सच्या खोल समुद्रात साजरा केला जाणार आहे.  

कोस्टा फास्किनोसा या क्रूझवर 6 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत या लग्नाचा माहोल असणार आहे. या क्रूझची 114500 टन माल वाहून नेण्याची क्षमता असून, त्यामध्ये जास्तीत जास्त 3800 अतिथी राहू शकतात. एवढ्या पाहुण्या सोय-यांचा लवाजमा हा एका उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नासाठी येणार आहे. दुबईतल्या डेन्यूब समूहाचे सर्वेसर्वा रिजवान साजन यांचा मुलगा आदेल साजन याच्या लग्नासाठी एवढी तयारी करण्यात आली आहे. डेन्यूब समूह हा दुबईमध्ये इमारत बनवण्यासाठी लागणा-या साहित्याचा पुरवठादार आहे. आदेल साजन हा या समूहाचा संचालक आहे. आदेल हा साना खान हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साना ही दंतवैद्य चिकित्सक, सौंदर्यवती, कलाकार आणि लेखक आहे.

चार दिवसांचा हा लग्न सोहळा बॉलिवूडच्या पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे. या लग्नाचं आयोजन वेडनिक्शा या विवाह नियोजन संस्था करत असून, ती स्वतः सोबत 1000 पाहुण्यांचा लवाजमा घेऊन येणार आहे. यात काही भारतीय उद्योगपती, नावाजलेल्या व्यक्तिमत्त्व आणि अरब अमिरातीतील बडे उद्योजकांचा समावेश असणार आहे. 6 एप्रिल ते 9 एप्रिल अशा चार दिवस चालणा-या या कार्यक्रमात 8 एप्रिल रोजी साना आणि आदेल लग्नबंधनात अडकणार आहे. इतर दिवशी अनेक संगीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, नावाजलेल्या व्यक्ती आणि बॉलिवूड कलाकारांना गिफ्टही देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जगभरात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं समुद्राच्या आत एका क्रूझवर लग्न सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे अनेकांना या लग्न सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title: The cruise will be on the Saptapadi