पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 07:19 IST2025-09-26T07:19:16+5:302025-09-26T07:19:53+5:30
घरांची पडझड, पशुधनाची मोठी हानी झाली आहे. मुढवी, धर्मगाव, बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, बोराळे, ताडोर येथे शेतजमिनी तळ्यासारख्या दिसत आहेत. मोठ्या आशेने मेहनत करीत १३ एकरवर कांद्याची लागवड केली पण...

पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा (सोलापूर) : डोणज येथील शेतकरी श्रीमंत केदार यांचे डोळे पाणावले होते. थरथरत्या आवाजात ते म्हणाले, ‘मी आजपर्यंत एवढे पावसाळे पाहिले; पण इतका भयानक पाऊस पाहिला नाही. शिवारावर डोलणारी पिके आज कुजत आहेत. बँकेचे १५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी १३ एकर कांद्याची लागवड केली होती; पण मेहनतीची सगळी स्वप्ने वाहून नेली. आता कर्जाचा फास कसा सोडवायचा आणि पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
श्रीमंत केदार यांचे हे शब्द जणू हजारो शेतकऱ्यांच्या वेदना उलगडतात. तालुक्यात सूर्यफूल, कांदा, तूर, उडीद, ऊस, केळी यासह भाजीपाला जमीनदोस्त झाला आहे. घरांची पडझड, पशुधनाची मोठी हानी झाली आहे. मुढवी, धर्मगाव, बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, बोराळे, ताडोर येथे शेतजमिनी तळ्यासारख्या दिसत आहेत.
बायकोचं सोनं ठेवून शेती केली; पुरानं पिकांची माती झाली
बायकोच्या गळ्यातील डाग बँकेत ठेवून कर्ज काढून एकर शेतामध्ये लावलेल्या उसासह मका, कांदा पूर्णपणे वाहून गेले आहे. राहती वस्तीही पाण्यात गेली आहे. माझा संसार आज उघड्यावर पडला, अशी व्यथा अष्टे बंधारा परिसरातील कोळेगाव हद्दीतील सीना नदीकाठावरील शेतकरी नितीन मच्छिंद्र देशमुख यांनी मांडली. शासनाने मदत करावी, असेही ते म्हणाले. मका, कांदा गेला वाहून पत्नी व दोन मुलांसह सिना नदीच्या काठावरती राहणारे देशमुख यांनी एक एकर ऊस, एकर मका व अर्धा एकर कांदा लावला होता. परंतु हातातोंडाला आलेले पीक वाहून गेले आहे.