The crisis ahead of the country is very serious, considering it fair to vote, says asududding owaisee | 'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा'

'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा'

मुंबई : देशावरील सध्याचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे.  परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सारासार विचार करुन योग्यपणे मतदानाचा वापर करावा, असे आवाहन एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. धारावी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार मनोज संसारे यांच्यासाठी 90 फूट रस्त्यावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

ओवेसी म्हणाले, माझ्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणारी काँग्रेस नेते, हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत आले आहेत. मुंबई दंगल प्रकरणी न्या. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात नाव असलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. सरकारने जीएसटी, नोटबंदी करुन सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त करुन टाकले. धारावीतील उद्योजकांना सरकारच्या धोरणांचा मोठा फटका बसला. राहुल गांधी सत्तर वर्षात विकास न झाल्याची कबुली देतात. काँग्रेसने UAPA सारख्या अन्यायकारक कायद्याच्या सुधारणेला भाजपला पाठिंबा दिला. त्याचा फटका दलित,  वंचित, मुस्लिम, कामगार, आदिवासी वर्गाला बसत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाईचे अनिर्बंध अधिकार त्यामुळे सरकारला मिळाले आहेत. 

काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून गांधी, नेहरु, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे. भाजपच्या हिंदुत्वासमोर काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग पत्करला, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे.  काँग्रेसचा मतदार भाजपकडे वळला आहे आणि काँग्रेस मात्र आमच्यावर टीका करत आहे, असेही औवेसी म्हणाले. दलित, वंचित, मुस्लिम, कामगार, आदिवासी या वर्गाने एकत्रीत येऊन जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. कुणाच्या मेहेरबानीने नव्हे तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशात मुस्लिम समाज आनंदात राहत असून शेवटपर्यंत राहील. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा कुणाच्या मर्जीची गरज नसल्याचे त्यांनी ठणकावले. उद्धव ठाकरेंना डोळे तपासण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पाकिस्तान व इतर कोणत्याही मुस्लिम देशांसोबत आमचा संबंध नाही, आमचा संबंध भारत या आमच्या देशाशी असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील धर्मनिरपेक्षता संपुष्टात आली असून भाजपला रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी काँग्रेसची असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, यावेळी, माजी नगरसेवक व पक्षाचे उमेदवार मनोज संसारे म्हणाले, पस्तीस वर्षांपासुन सत्ता उपभोगणाऱ्या गायकवाड घराण्याने धारावीचा विनाश केला. केंद्र व राज्यात सत्ता असताना धारावीला स्वर्ग बनवू शकत होते. स्वर्ग बनवण्याऐवजी त्यांनी धारावीला नरक बनवले. विकास करण्यात अपयशी ठरले. अपक्ष, नगरसेवक म्हणून जे काम मी वडाळा मध्ये करु शकलो ते देखील धारावीत होऊ शकले नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प 2004 मध्ये सुरू झाला. मात्र, 15 वर्षांच्या कालावधीत नागरिकांना केवळ मुर्ख बनवण्यात आले. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारप्रमाणे भाजप सरकारने फसवणूक केली. धारावीचा बीकेसी प्रमाणे विकास करु असे आश्वासन त्यांनी दिले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The crisis ahead of the country is very serious, considering it fair to vote, says asududding owaisee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.