Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:45 IST2020-03-24T16:43:45+5:302020-03-24T16:45:13+5:30
Coronavirus: राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना शटर ओढून आतमध्ये काम करायला लावणाऱ्या दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे.

Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड
नागपूर : कोरोना व्हायरस पसरू लागल्याने राज्यभरात नाईलाजाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कंपन्या आदेश देऊनही कर्मचाऱ्यांना कामावर बोलावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. तरीही काही कंपन्या मुजोरपणे काम सुरुच ठेवत असून कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने कामावर बोलावत आहेत. अशाच एका कंपनीला नागपूर महापालिका आयुक्तांनी चांगलाच धडा शिकविला आहे.
राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना शटर ओढून आतमध्ये काम करायला लावणाऱ्या दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
राज्यभरातील खासगी, कार्पोरेट आणि अन्य कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशाच सूचना मुंढे यांनीदेखील दिल्या आहेत. असे असताना वर्धमाननगरातील ठवकर कंपनीने कामगारांना कामावर बोलावले होते. धक्कादायक म्हणजे शटर बंद करून त्यांच्याकडून काम करवून घेण्यात येत होते. मनपाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळाली. त्यांच्या शोध पथकाने धाड टाकली तेव्हा कंपनीमध्ये ६० ते ७० जण काम करताना आढळून आले. यामुळे कंपनीवर लाखाचा दंड ठोठावण्यात आला.
दुसऱ्या एका प्रकरणात याच नगरातील बजाजचे शो रुमवर धाड टाकण्यात आली. या ठिकाणीही मागील दरवाजातून कामगारांना आत घेतले गेले होते. आतमध्ये काम सुरु असल्याचे पाहून शोरुम मालकाला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. यामुळे तुकाराम मुंढे यांनी उद्योजकांना इशारा दिला असून जर पुन्हा कोणी कायद्याचे उल्लंघन करताना आढळल्यास यापेक्षा कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.