coronavirus: राज्यात रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टद्वारे पंधरा मिनिटांत होणार कोरोनाचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:24 AM2020-07-08T04:24:01+5:302020-07-08T07:31:24+5:30

या चाचणीला आयसीएमआरसह आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सनेही मान्यता प्रदान केली आहे. ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर निदानासाठी नाकातील स्राव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली एक तासाच्या आत करावी लागते.

coronavirus: Rapid antigen test in the state will detect corona in 15 minutes | coronavirus: राज्यात रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टद्वारे पंधरा मिनिटांत होणार कोरोनाचे निदान

coronavirus: राज्यात रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टद्वारे पंधरा मिनिटांत होणार कोरोनाचे निदान

Next

- राजेश भोजेकर
चंद्रपूर : कोविड-१९ साठी आरटीपीसीआर ही एकमेव निदान चाचणी आहे. यामध्ये बराच वेळ लागतो. कार्टिजची अनुपलब्धता व जास्तीचा खर्च ही या चाचणीची उणे बाजू आहे. आता वेळ व खर्चाच्या बचतीचा ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट’चा पर्याय पुढे आला आहे. राज्य शासनानेही चाचणीचा पर्याय निवडला असून, अवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान होणार आहे.

या चाचणीला आयसीएमआरसह आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सनेही  मान्यता प्रदान केली आहे. ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर निदानासाठी नाकातील स्राव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली एक तासाच्या आत करावी लागते. चाचणीचे निदान केवळ १५ वा जास्तीत जास्त ३० मिनिटांत होते. ही चाचणी कोणत्याही बाह्य उपकरणाशिवाय नुसत्या डोळ्याने करता येते. यामध्ये निगेटिव्ह निदान ९९.३ ते १०० टक्के, तर पॉझिटिव्हचे प्रमाण ५०.६ ते ८४ टक्के आहे. या चाचणीसाठी केवळ ४५० रुपये खर्च येतो, शिवाय वेळही वाचतो. एक किट एकदाच उपयोगात येते.

कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट, शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयामध्ये तातडीच्या उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टचा उपयोग करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने ४० हजार किट खरेदीला मान्यता दिली आहे. यासाठी आपत्ती निवारण निधीतून ४.५० कोटी रुपये मंजूर केले आहे. नागपूर विभागात या किट उपलब्ध झाल्या आहेत.

अशा व्यक्तींची करता येणार टेस्ट

कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करता येते. फ्ल्यू सदृश तसेच अतिजोखमीच्या व्यक्तीच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या, इतरमध्ये हृदय विकार, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड, मधुमेह, रक्तदाब इत्यादी विकार, त्याचप्रमाणे केमोथेरेपी, एचआयव्ही पॉझिटिव्ह, अवयव प्रत्यारोपण केलेले वा वृद्ध व्यक्ती, गरोदर महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये आंतररुग्ण भरतीसाठी तातडीची चाचणी म्हणून ‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट’चा उपयोग केला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला १ हजार रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट किट प्राप्त झाल्या आहे. या चाचणीसाठी विशिष्ट पथक तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर लवकरच प्रत्यक्ष चाचणीला सुरूवात केली जाईल. या चाचणीसाठी तालुकास्तरावर केंद्र उभारले जाणार आहे. तसेच आवश्यक तेथे मोबाईल व्हॅनद्वारेही चाचणीची सुविधा दिली जाणार आहे. कमी वेळात अधिक चाचण्या यामुळे शक्य आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.

Web Title: coronavirus: Rapid antigen test in the state will detect corona in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.