CoronaVirus News: गेल्या वर्षी केंद्र सरकारने केलेल्या चुका राज्य शासनाने करू नयेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 02:25 AM2021-04-05T02:25:27+5:302021-04-05T02:25:59+5:30

नागरिकांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही त्याची काळजी, खबरदारी घेत निर्णय घ्यावेत, अशी विनंतीच तज्ज्ञांनी सरकारला केली आहे. 

CoronaVirus News: The mistakes made by the central government last year should not be made by the state government! | CoronaVirus News: गेल्या वर्षी केंद्र सरकारने केलेल्या चुका राज्य शासनाने करू नयेत!

CoronaVirus News: गेल्या वर्षी केंद्र सरकारने केलेल्या चुका राज्य शासनाने करू नयेत!

Next

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पार गेला आहे. परिणामी आता कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर निर्बंध लावा. असे निर्बंधच आपल्याला यातून बाहेर काढू शकतील. मात्र लॉकडाऊन लावू नका, असा सूर सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी लगावला आहे. शिक्षण, अर्थकारण, संस्कृती, कामगार, वाहतूक अशा प्रत्येक घटकाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. आता हे असेच सुरू राहिले. लोकांनी नियम पाळले नाहीत तर मोठी किंमत मोजावी लागेल. गेल्या वर्षी कोरोनाचे समूळ उच्चाटन करताना केंद्राने ज्या चुका केल्या त्या चुका राज्याने करू नयेत. तज्ज्ञांशी बोलून निर्णय घ्यावेत. नागरिकांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही त्याची काळजी, खबरदारी घेत निर्णय घ्यावेत, अशी विनंतीच तज्ज्ञांनी सरकारला केली आहे. 

हातावर पोट आहे त्यांचे काय होणार हा प्रश्नच आहे. मागच्या वेळी केंद्राने मदत केली म्हणून आपण काही तरलो. राज्य सरकारने त्यावेळी काहीच मदत केली नाही. वाऱ्यावर सोडले होते. आज पुन्हा परिस्थिती तशीच होते आहे. आता कुठे फेरीवाले किंवा हातावर पोट असणारे स्थिर होत होते; पण पुन्हा अडचण येत आहे. घरेलू कामगारांना आता अडचणी येतील. त्यांना सोसायट्या बंद होतील. त्यांची नोकरी जाईल. मात्र, अशा लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या.
- सुभाष मराठे निमगावकर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना  

. गेल्या लॉकडाऊनच्या काळात बहुतांश कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’साठी आवश्यक सुविधा उभ्या केल्या होत्या. त्यांना ती व्यवस्था कायम सुरू ठेवण्याची सूचना करावी. कामाच्या वेळा बदलाव्यात, जेणेकरून लोकलमधील गर्दी कमी होईल. बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य घ्यावे. सद्य:स्थितीत ते पूर्ण सहकार्य करतील. भाजीविक्रेते फेरीवाल्यांना मोकळ्या मैदानात जाण्याची सक्ती करावी, ऐकत नसल्यास कठोर कारवाई करावी.
- सुधाकर अपराज, विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट

नागरिकांच्या सहकार्याने कोरोना नियंत्रणात आणता येईल. नागरिकांनी  शिस्त पाळून मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हात सतत धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क घालत नसलेल्या नागरिकांकडून पाच हजार रुपये दंड वसूल करावा आणि हे काम पालिकेऐवजी पोलिसांकडे सोपवावे. आधीच अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेकारी वाढली आहे. संपूर्ण लॉकडाऊन हा परवडणारा नाही.  ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण जास्त आहेत तो भाग सील करावा.
- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन

सध्या राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता कठोर निर्बंधांची गरज आहे. बाजारपेठा, लोकलच्या वेळा, मॉल, सिनेमागृह येथील प्रवेशावर बंधने घातली पाहिजेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यात तात्पुरत्या कोविड केंद्राची उभारणी, कंत्राट पद्धतीवर मनुष्यबळाची भरती, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी यंत्रणांनी घेतली पाहिजे.
- डॉ पार्थिव संघवी, आयएमए सदस्य.

राज्यासह शहरातील लसीकरण मोहीम व्यापक करण्याची अधिक गरज आहे, सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालणे अत्यवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आरोग्यसेवा क्षेत्रासाठी भरीव निधी, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ यांची तरतूद करणे आवश्यक आहे. मागील लॉकडाऊनच्या वेळीस मोठ्या प्रमाणात लोकांना मानसिक आरोग्याच्याही समस्या उद्‌भवल्या होत्या, त्यांच्या निराकरणासाठी हेल्पलाईन, समुपदेशन या पातळ्यांवरही प्रयत्न केले पाहिजेत. 
- डॉ अभिजित मोरे, जनआरोग्य चळवळ, सदस्य.

‘कोरोना अहवालाबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम आहेत. एकाच व्यक्तीचे अहवाल दोन वेगवेगळ्या लॅबमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह येतात. राज्य सरकारने ‘’टेस्टिंग लॅब’’ची विश्वासार्हता पडताळावी. तसेच खासगी लॅबमध्ये असलेली दोन-दोन दिवसांची वेटिंग टाळण्यासाठी सरकारी ‘’टेस्टिंग फॅसिलिटी’’ घरपोच मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व ऑफिससाठी कोरोना काळात ठोस नियमावली जाहीर करावी. जेणे करून त्या ठिकाणी होणारे गैरप्रकार टाळता येतील.
- रमेश चव्हाण, व्यावसायिक

 धार्मिक कार्यक्रम आयोजित करता कामा नयेत. कामगारांसाठी जी रुग्णालये आहेत ती सर्वसामान्यांसाठी खुली केली पाहिजेत. हे जनतेच्या उपयोगाला आले पाहिजेत. आवश्यकता असेल तर लॉकडाऊनचा विचार करावा. मुख्यमंंत्र्यांनी तज्ज्ञांच्या मताप्रमाणे निर्णय घ्यावा.
- मिलिंद रानडे, 
प्रवक्ता, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया

‘केंद्र आणि राज्य सरकार त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळत आहेतच. मात्र, नागरिकांनीदेखील त्यांना सहकार्य करीत योगा, व्यायाम यासारख्या गोष्टींवर भर देऊन स्वतःला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. कारण कोरोनाची घातकता ही प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे ती वाढविणे हे प्रत्येकाच्या हातात आहे त्यानुसार नागरिकांनी त्यावर भर देणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोनाच काय, तर आपल्याला कोणत्याही व्हायरसशी सहज दोन हात करता येतील.                       - संजय मोदी, प्लेटलेट्स डोनर

बाजारपेठा, बसगाड्या, रेल्वेमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. शहरांच्या धर्तीवर ग्रामीण भागांतही आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रादुर्भाव अधिक असलेले प्रभाग शोधून अधिकाधिक चाचण्या कराव्यात. मास्कबाबत अजूनही काहीजणांना गांभीर्य नाही; त्यांच्यावर कडक कारवाई करावी. लसीकरणाचे प्रमाण वाढवावे.
- अर्चना सबनीस, मुंबई ग्राहक पंचायत
 

Web Title: CoronaVirus News: The mistakes made by the central government last year should not be made by the state government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.