CoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या मदतीला रेल्वे आली धावून, राज्यासाठी १७६ आयसोलेशन कोचची साेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 07:03 IST2021-04-12T04:45:40+5:302021-04-12T07:03:55+5:30
CoronaVirus News: गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले.

CoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या मदतीला रेल्वे आली धावून, राज्यासाठी १७६ आयसोलेशन कोचची साेय
मुंबई : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर करता येईल. देशात साडेपाचशेहून अधिक, तर राज्यात १७६ आयसोलेशन कोच उपलब्ध असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा, प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचे रूपांतर बाथरूममध्ये करण्याची संरचना तयार केली आहे.
गेल्या वर्षी काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मध्य रेल्वेकडून ४८२ आयसोलेशन कक्ष तयार केले होते. मात्र राज्य सरकारकडून आयसोलेशन कक्षाची मागणी न केल्याने कोच पडून होते. दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाला श्रमिक रेल्वे, इतर मेल, एक्स्प्रेससाठी कोच कमी पडू लागले. त्यामुळे
रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार श्रमिक विशेष गाड्या वाढविण्यासाठी आयसोलेशन कोचचे रूपांतर पुन्हा नियमित प्रवासी डब्यात केले.
त्यामुळे आता मध्य रेल्वेकडे केवळ
४८ कोच उपलब्ध असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने
सांगितले.
पश्चिम रेल्वेचा विचार केल्यास सद्य:स्थितीत पश्चिम रेल्वेकडे मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कोच आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर विभागात ४८ आयसोलेशन कोच आहेत.
एका डब्यात २४ खाटा
मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कक्ष तयार आहेत. एका डब्यात २४ खाटा आहेत. राज्य सरकारने आयसोलेशन कक्षाची मागणी केल्यास त्यांना ते वापरण्यासाठी देण्यात येतील.
- आलोक कंसल, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे