coronavirus : कोरोनाविरोधात लढाईसाठी काँग्रेसकडून COVID19 टास्कफोर्सची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 14:20 IST2020-04-09T14:14:34+5:302020-04-09T14:20:40+5:30
कोरोना विरोधातील युद्धात काँग्रेस पक्षही राज्य सरकारच्या मदतीसाठी उतरला मैदानात

coronavirus : कोरोनाविरोधात लढाईसाठी काँग्रेसकडून COVID19 टास्कफोर्सची स्थापना
मुंबई - राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स व विविध उपसमित्यांची घोषणा केली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून माजी खासदार भालचंद्र मुणगेकर हे समन्वयक आहेत.
या टास्कफोर्सच्या अंतर्गत विविध उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यात सामाजिक व आर्थिक परिणाम उपसमिती, आरोग्य उपसमिती, शासकीय उपाययोजना अवलोकन उपसमिती व माध्यम, सोशल मीडिया व मदत कक्ष या उप समित्या कार्यरत असतील.
राज्य सरकारला मदत कार्यात सहकार्य करणे, आवश्यकता असेल तेथे सूचना व मार्गदर्शन करणे, काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु असलेले मदत कार्य गतीमान करणे, काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना कोविड-१९ च्या लढ्यात मदत करणे, त्यांना अधिकाधिक सक्रीय करणे, कोविड-१९ च्या संदर्भाने सरकारच्या उपाययोजना आणि वास्तव परिस्थिती याबाबत सातत्याने माहिती घेऊन साप्ताहिक अहवाल सादर करणे, ऑडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबिनार आदी माध्यमातून ही टास्क फोर्स कार्यरत राहणार आहे.