CoronaVirus : BJP MLA's salary is not paid to the Chief Minister's relief Fund by devendra fadanvis vrd | CoronaVirus : ...म्हणून भाजपा आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं नाही!

CoronaVirus : ...म्हणून भाजपा आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं नाही!

मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. राज्यात विरोधी पक्षसुद्धा सत्ताधाऱ्यांच्या हातात हात मिळवून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भाजपा कशा प्रकारे मदत करत आहे, यासंदर्भात लोकमतनं बातचीत केली आहे. कोरोनाच्या धोकादायक पातळीवर आपण आता आहोत. अजूनही  कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही. पण आपण थोड्या चुका केल्यास कम्युनिटी स्प्रेडकडे  जाऊ शकतो, अशा प्रकारची अवस्था आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.लोकमत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. 

त्यांना सीएम फंडाला मदत न केल्याची विचारणा केली असता ते म्हणाले, पीएम फंड आणि सीएम फंड असा कोणताही भेद या ठिकाणी नाही. आमच्या आमदारांचे पैसे आहेत, ते भाजपा आपदा निधीला आम्ही दिले. ज्या वेळी तीन जिल्ह्यामध्ये पूर आला,  त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं स्वतंत्रपणे आपले निधी तयार केले, त्यांनी पैसे घेतले आणि त्यातून लोकांची सेवा केली. आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवल्यानंतर शिवसेनेनं शिवजल योजना तयार केली. एक वेगळं अकाऊंट उघडून त्यातून त्यांनी कामं केली. शेवटी जनतेची कामच आपण करतो आहोत. जर कोणाला सीएम फंडाला मदत करायची असल्यास त्यांनी जरूर करावी, असं मी जनतेला आवाहन करतो आहे. आतापर्यंत जे काही पॅकेजेस आले, ते सर्व केंद्र सरकारनं दिले आहेत. राज्य सरकारनं अजून एकही पॅकेज दिलेलं नाही. प्रत्येकाचा भार केंद्राच्या तिजोरीवर पडणार आहे. केंद्राकडेही पैशाचं झाड नाही आणि राज्य सरकारकडेही पैशांचं झाड नाही. त्यामुळे असा कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही.

महाराष्ट्रात ५२ लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आमच्या आमदारांच्या निधीच्या माध्यमातून किंवा आपदा निधीच्या माध्यमातून आम्ही अन्नधान्य जमा करून महाराष्ट्रातल्याच लोकांपर्यंत पोहोचवतो. पंतप्रधानांचा निधी आहे, मुख्यमंत्र्यांचा निधी आहे, आमचाही निधी आहे आणि स्वयंसेवी संस्थांचाही निधी आहे. त्यामुळे जनतेनं जिथे चांगलं काम सुरू आहे, तिथे मदत करावी. आम्ही कोरोना आपदा कोष तयार केला आहे. या कोषातल्या पैशातूनच आम्ही महाराष्ट्रात आमच्या सेवा चालवतो आहोत. आमच्या आमदारांचे पगार आम्ही दिलेले आहेत. त्यावर अवलंबून राहून चालणार नाही. आम्ही आतापर्यंत अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. तीन ते चार दिवसांत १२ ते १४ लाख लोकांपर्यंत पोहोचू. ५२ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं आमचं टार्गेट आहे. एवढ्या लोकांपर्यंत पोहोचायचं असल्यास आम्हालाही स्त्रोताची गरज आहे.

अनेक लोक पीएम फंड, सीएम फंड आणि आम्हालाही पैसे देत आहेत. यात वावगं काहीच नाही, त्यामुळे मी पुन्हा सांगतो की, तीन जिल्ह्यांत जेव्हा महापूर आला होता, तेव्हा शिवसेनेनं वेगळं अकाऊंट उघडलं होतं, त्यावेळी ते आमच्यासोबत सरकारमध्ये होते. सरकारमध्ये असूनदेखील त्यांनी सीएम फंडाला पैसे दिले नाहीत. त्यांनी वेगळं अकाऊंट उघडलं. त्या माध्यमातून त्यांनी त्यांची सेवा केली, त्यावर आमचा कुठलाही आक्षेप नाही. आम्हाला सुद्धा जनतेची सेवा करायची असल्यानं सेनेचा मार्ग पत्करला असल्यास कोणालाही त्यावर आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही. मी आमच्या आपदा कोषलाही पैसे दिले आहेत आणि पीएम कोषलाही पैसे दिले आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या ऐपतीप्रमाणे मदत करायला हवी, असाही फडणवीसांनी सल्ला दिला आहे. 

पंतप्रधानांनी योग्य वेळी संपूर्ण लॉकडाऊन केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मोठ्या प्रमाणात आपण हा स्प्रेड होण्यापासून वाचवू शकलो. इटली, स्पेन आणि अमेरिकेत ज्या पद्धतीनं कोरोना व्हायरस पसरला आहे, तेवढा भारतात  पसरलेला नाही. कोरोनापासून बचाव करण्याचं एकमेव साधन म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हेच आहे. घराबाहेर न पडणे, आयसोलेशनमध्ये राहणे अशा पद्धतीनंच आपण कोरोनाला रोखू शकतो. भारत एक टीम असून, एकत्र होऊन कोरोनाशी लढा देत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. 

Web Title: CoronaVirus : BJP MLA's salary is not paid to the Chief Minister's relief Fund by devendra fadanvis vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.