coronavirus: Ajit Pawar angry on attackers who attack on police & doctors, said ... BKP | coronavirus : पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर अजितदादा संतापले, म्हणाले...

coronavirus : पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर अजितदादा संतापले, म्हणाले...

ठळक मुद्देडॉक्टर व पोलिसांवरील हल्ले दुर्दैवी. असे हल्ले सहन केले जाणार नाहीतपोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त व संयम पाळावाप्रवासबंदी असताना दुधाच्या टँकरमधून प्रवास करण्यासारख्या घटना गंभीर

मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही लोक रस्त्यावर उतरत आहेत त्यातून पोलीस आणि लोकांमध्ये वाद होऊन पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत. दरम्यान, पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  पोलीस आणि डॉक्टरांवर होणारे हल्ले कदापिही सहन केले जाणार नाहीत. असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अजितदादा यांनी दिला आहे.
तसेच जनता आणि पोलिसांनी स्वयंशिस्त आणि संयम पाळावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराला बोलावण्यास भाग पाडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तू मिळत राहतील, असे सांगूनही लोकांनी खरेदीसाठी गर्दी करणे चिंताजनक आहे. तसेच प्रवासबंदी असतानाही लोकांनी दुधाच्या गाडीतून प्रवास करणे गंभीर आहे. वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं ‘कोरोना’चं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही  त्यांनी केलं आहे.

राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी,  दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे.  या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

सद्यस्थितीत राज्यातील कोरोनाचे संकट अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असताना मृतांचा आकडाही हळुहळू वाढू लागला आहे. वाशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे. 

 राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल आदी भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा 124  वर पोहोचला आहे.

English summary :
Ajit Pawar angry on attackers who attack on police & doctors

Web Title: coronavirus: Ajit Pawar angry on attackers who attack on police & doctors, said ... BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.