Corona virus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या : मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 01:26 PM2020-03-17T13:26:20+5:302020-03-17T13:34:04+5:30

आई-वडिलांना भेटा, मुलांबरोबर गप्पा मारा, खेळही खेळा

Corona virus : Take advantage of 'closed' holidays for relationships: the advice of psychologist | Corona virus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या : मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला 

Corona virus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या : मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला 

Next
ठळक मुद्देमनावरचा ताण कमी करायचा असेल, तर त्यासाठी सुसंवाद असणे गरजेचेसार्वजनिक ‘बंद’वर टीका करण्याऐवजी त्याचा आपण सदुपयोग नक्कीच करून घेऊ राहून गेलेल्या गोष्टींना वेळ द्या

पुणे : तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या अगदी शेजारी बसून, त्यांचे हात हातात घेऊन शांतपणे बोलला त्याला किती दिवस झाले? मुलांबरोबर काही खेळ खेळलात, ते आठवते आहे का? बायकोला घरकामात शेवटची मदत कधी केली होती! पाहा बरं थोडं आठवून!  या सगळ्या प्रश्नांची अनेकांच्या बाबतीत नकारार्थी असलेली उत्तरे सकारात्मक करण्याची संधी आहे. कोरोनामुळे झालेल्या ‘बंद’मधून ही संधी आली असल्याचे बहुसंख्य मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारी यंत्रणेने अनेक पावले उचलली आहेत. त्यात प्रामुख्याने सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा, चित्रपटगृह, नाट्यगृह, जाहीर सभा, संवाद, मुलाखती असे सगळे काही बंद आहे. इतकेच नव्हे तर शाळांपासून ते महाविद्यालयांपर्यंतच्या परीक्षाही काही कालावधीपुरत्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. कुठेही जाऊ नका, अनावश्यक फिरू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. याचा सरळ अर्थ सगळे काही बंद करून घरात बसा असाच आहे. फक्त बसून करायचे काय, असा प्रश्न त्यातूनच निर्माण झाला आहे.
त्यावरच काही मानसोपचार तज्ज्ञ; तसेच डॉक्टरांबरोबर संवाद साधला असता त्यांनी ही तर मोठीच संधी आहे, असे मत व्यक्त केले.  समुपदेशक डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, ही संधी आहे आपल्याच मुलांना वेळ देण्याची, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची. इतर वेळी कामाचा व्याप, कामाचा ताण यामुळे मुलांना क्वॉलिटी टाइम देता येत नाही. आपण घरी, तर मुले झोपलेली व आपण जागे, तर ती शाळेत गेलेली असेच होत असते. आता सगळेच घरी, तर त्यांच्याबरोबर बसा, फक्त बसाच नाही तर त्यांच्याबरोबर खेळा, त्यांना हस्तकला, चित्रकला, शिल्पकला असे काहीतरी करायला शिकवा व तुम्हीही शिका. बोटांचा वापर फक्त मोबाईलसाठी असेच काहीसे झाले आहे. बोटं वापरून कातरकाम, चिकटवही, शिल्प, चित्र करता येतात, अन्यही बरेच काही करता येते हे मुलांना यानिमित्ताने सांगता येईल, दाखवता येईल.
चौकोनी किंवा हल्ली तर त्रिकोणी कुटुंबव्यवस्थेमुळे तरुण पिढीसाठी त्यांच्या आईवडिलांचे वेगळे व स्वतंत्र असे जग झाले आहे. त्यांचाच मुलगा त्यांना कित्येक दिवस भेटत नाही, भेटला तरी बोलत नाही, बोलला तरी त्यात संवाद नसतो तर फक्त विचारापासून व तीसुद्धा कोरडीच असाच अनेकांचा अनुभव आहे. तो बदलण्याची संधी या सार्वजनिक ‘बंद’मुळे आली असल्याचे काही मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
.......
मनाचे आरोग्य सुधारेल
मनावरचा ताण कमी करायचा असेल, तर त्यासाठी सुसंवाद असणे गरजेचे असते. हे फक्त नात्यापुरतेच नाही, तर मित्र-मैत्रिणींसाठीही तेवढेच गरजेचे आहे. नेमका हा सुसंवादच आपण मोबाईल किंवा संगणकाच्या पडद्याबरोबर मैत्री केल्यामुळे हरवला आहे. या सार्वजनिक ‘बंद’वर टीका करण्याऐवजी त्याचा आपण सदुपयोग नक्कीच करून घेऊ शकतो. हाही वेळ पुन्हा मोबाईलवर किंवा कोणत्याही स्क्रीनवर घालवू नका, असे माझे आवाहन आहे. घरातल्यांबरोबर बोला, नातेवाइकांबरोबर बोला, बोलत राहा.-डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ.
.........
राहून गेलेल्या गोष्टींना वेळ द्या
फक्त मुले किंवा आईवडिलांबरोबरच बोला असे नाही, तर तुमची, तुम्हाला करावे असे वाटलेली पण करता आली नाही अशी कोणतीही गोष्ट तुम्ही या काळात करू शकता. त्यात गाणी ऐकणे व वाचन-लेखन करणेही आले. वेळ मिळाला आहे तर तो सर्वांबरोबर घालवा, तसेच स्वत:लाही द्या. मनाच्या आरोग्यासाठी तेही गरजेचेच असते.-डॉ. श्रुती पानसे, समुपदेशक 

........

स्वत:चा शोध घेणे ही बहुतेकांना आध्यात्मिक गोष्ट वाटेल; मात्र ती मनाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. असा वेळ आपण आपल्याला कधीच देत नाही, तो या सार्वजनिक ‘बंद’मुळे देता येईल. यातून तुम्ही तुमच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घ्या, त्यातून मग एक चांगले तुम्हाला योग्य वाटेल असे वेळापत्रक तयार करा. पहिल्या टप्प्याचा विचार करतानाच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही घरात किंवा नात्यात काहीच वेळ देत नाही आहात. तेवढे उमजले की मग पुढचे सगळे आपोआप होईल.
    - डॉ. भूषण म्हेत्रे, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Corona virus : Take advantage of 'closed' holidays for relationships: the advice of psychologist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.