धक्कादायक! मुंबईत कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ, एकाच दिवसात आढळले ३०६२ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 03:17 AM2021-03-20T03:17:45+5:302021-03-20T06:54:06+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते.

Corona outbreak in Mumbai, 3,062 new cases found in a single day | धक्कादायक! मुंबईत कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ, एकाच दिवसात आढळले ३०६२ नवे रुग्ण

धक्कादायक! मुंबईत कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ, एकाच दिवसात आढळले ३०६२ नवे रुग्ण

googlenewsNext

मुंबई: आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णवाढीची नोंद शुक्रवारी मुंबईत झाली. दिवसभरात तब्बल ३०६२ बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. पुढील चार ते सहा आठवडे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्यात येणार आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी करून शून्यावर आणण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना सुरू आहेत. गेल्या महिन्यापासून मुंबईत दररोज एक हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज रुग्णसंख्येत चारशे ते पाचशेने वाढ होत आहे. (Corona outbreak in Mumbai, 3,062 new cases found in a single day)

गेल्या वर्षीच्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता १२४ दिवसांवर आला आहे, तर सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण ०.५६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

‘४८ तासांमध्ये सज्ज व्हा’
जुलै २०२० मधील स्थितीशी तुलना करता, मुंबईतील शासकीय रुग्‍णालयांमधील खाटांची संख्‍या अधिक आहे. पालिका रुग्‍णालयांमध्‍येदेखील ही क्षमता वाढविण्‍यात येत आहे. त्‍याच धर्तीवर सरकारी रुग्‍णालयांप्रमाणे सर्व खासगी रुग्‍णालयांनी पुन्‍हा कोविड खाटांची संख्या येत्‍या ४८ तासांमध्‍ये वाढवावी, अशी सूचना मुंबई पालिका आयुक्तांनी केली आहे. यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू खाटा असाव्यात, त्यासाठी साधनसामग्री व मनुष्‍यबळ आदी सर्व व्‍यवस्‍था युद्धपातळीवर करून सर्व कार्यवाही पूर्ण केल्‍याची माहिती रुग्‍णालयांनी ४८ तासांची मुदत संपताच पालिकेला द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणार
मुंबईत आतापर्यंत ११ हजार ५६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दहा जणांचा मृत्यू झाला, यात पाच पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. यापैकी आठ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तर तीन रुग्ण ४० वर्षांवरील व सात रुग्ण ६० वर्षांवरील होते. आतापर्यंत ३६ लाख ६२ हजार ४७२ चाचण्या करण्यात आल्या. मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.
 

Web Title: Corona outbreak in Mumbai, 3,062 new cases found in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.