"विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती, राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश होणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 13:14 IST2024-05-26T13:14:15+5:302024-05-26T13:14:47+5:30
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली माहिती

"विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती, राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश होणार"
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे, मात्र त्याआधीच महायुतीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळणार असून, विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करण्यासाठी महायुतीची लवकरच समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आयोजित केलेल्या प्रचार सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असून महायुती ३५ ते ४० जागांवर विजयी होईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही अशा प्रकारचे यश मिळण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी असतील. विशेषत: जागावाटपाची जबाबदारी या समितीवर असेल. ज्या पक्षाची संबंधित मतदारसंघात ताकद असेल, तो मतदारसंघ अन्य पक्षाला दिला जाणार नाही. त्यामुळे महायुतीला अधिकाधिक जागा जिंकणे शक्य होईल.
अजित पवार गटात इनकमिंग
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, आजी-माजी खासदार व आमदार, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दि. २७ मे रोजी मुंबईत होणार आढावा बैठक.
- १० तारखेला वर्धापनदिन आहे. हा वर्धापनदिन मुंबई आणि दिल्लीत साजरा करण्याचे नियोजन आहे. त्या बैठकीला सर्व नेते उपस्थित राहतील. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होईल.
- हा पक्षप्रवेश राज्याच्या, देशाच्या आणि पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल.