VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:29 IST2025-10-10T12:13:02+5:302025-10-10T12:29:02+5:30
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त विधान केले.

VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
Minister Babasaheb Patil on Farmer Loan Waiver : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी संपूर्ण शेतीच वाहून गेली. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वादग्रस्त विधान केले. तसेच आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो अशीही कबुली मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एका बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी केली जातेय. अशातच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे म्हटलं जात आहे.
"लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो. लोकांनी ठरवायला हवं की त्यांनी काय मागायचं आहे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदास यांच्यासारखा माणूस गेला आणि लोकांनी सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार आहोत. लोकांनी काय मागावं हे ठरवावं. अनिलभाई आजची वेळ मारुन नेण्यासाठी नदीही देऊन टाकू तुला म्हणतील. म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागायचं हे ठरवायला हवं. निवडणुकीत निवडून यायचं आहे म्हणून आम्ही आश्वासने देतो," असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.
मंत्री बाबासाहेब पाटील हे काही महिन्यांपूर्वी देखील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळीही त्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मंत्रिपदाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. पत्रकारांनी अनिल पाटील यांच्या संभाव्य मंत्रिपदाविषयी त्यांना तेव्हा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना, गेल्यावेळी अनिल पाटलांना मंत्रिपद दिले तेव्हा गोड वाटलं का? असं बाबासाहेब पाटील म्हणाले होते. यावेळीही जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. तसेच कर्जमाफीच्या विषयावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय.
बाबासाहेब पाटील यांची दिलगिरी
"ग्रामीण भागात अर्थव्यवस्था बळकट करायची आहे, शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल तर पश्चिम महाराष्ट्रात गोळुकसारखी व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. माझ्याही मतदारसंघात पतसंस्था आहे, आम्ही देखील दुधाच्या व्यवसायासाठी पैसे दिलेले आहेत. या बँकेतून जे कर्ज देणार आहोत त्यासाठी कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. मी सुद्धा शेतकरी आहे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो," असं स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिलं.