अध्यक्ष महोदय..मी आलोय! 'अमृतावहिनी' अन् 'शुका'चा संवाद..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 09:11 AM2020-09-20T09:11:00+5:302020-09-20T09:15:02+5:30

मा.सीएम बाई ऊर्फ वहिनीसाहेबांनी जखमी पोपटाची शुश्रुषा केल्याने-खाऊपिऊ घातल्याने तो त्यांच्याकडे ‘मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...’असे ओरडत वारंवार येत आहे...

Conversation of Hon'ble Amritavahinisaheb and 'one' parrot... | अध्यक्ष महोदय..मी आलोय! 'अमृतावहिनी' अन् 'शुका'चा संवाद..

अध्यक्ष महोदय..मी आलोय! 'अमृतावहिनी' अन् 'शुका'चा संवाद..

googlenewsNext

सध्या मनालीकर्णिका नव्हे... मनकर्णिका नव्हे...कंगना रानौत (...की राणावत की राणौत की रनोट?) छे बुवा. अगदी नाव-आडनावापासूनच वाद-मतभेदांना सुरुवात होते राव... तर सध्या या रानौतने पेटवलेल्या रणामुळे एक घटना मात्र अदखलपात्र झाली. तिच्याकडे माध्यमांचं फारसं लक्षच गेलं नाही. यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्राचं लक्ष या घटनेकडे वेधत आहोत. माजी सीएमबाईंच्या घराच्या टेरेसमध्ये एक पोपट सध्या रुंजी घालत आहे. (असतं एकेकाचं नशीब... कुणाच्या अंगणात अगदी मोरही येऊन चारा खातात. नाचतात. आमच्या अंगणात मात्र भटकी कुत्रीच येतात)...तर मा. सीएम बाई ऊर्फ वहिनीसाहेबांनी या जखमी पोपटाची शुश्रुषा केल्याने-खाऊपिऊ घातल्याने तो त्यांच्याकडे ‘मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...’असे ओरडत वारंवार येत असल्याचे समजले. नुसता येत नाही, तर वहिनीसाहेबांच्या हाता-खांद्यावरच नव्हे तर चक्क त्यांच्या डोक्यावरही बसतो. (तसे फोटोच त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत)  सत्ता नसताना यांच्या घरी रुंजी घालणारा असा कोणता वेडा पोपट आहे, असा खडूस प्रश्न विरोधकांच्या मनात येऊ शकतो. सत्ता जाणाऱ्यांच्या घरी शुकशुकाट असतो. मात्र, देवेंद्र’दरबारी या शुकाचा म्हणजेच पोपटाचा वावर आहे. सीएमबाईंचे ‘ट्विट, ट्विट’ ऐकून तोही ‘स्वीट, स्वीट’ म्हणजेच ‘मिठू मिठू...’ अशी पोपटपंची करत आहे. (पीजे आहे मान्य) असो. त्या पोपटाला वहिनीसाहेबांकडे ‘अ‍ॅक्सिस’ मिळाला हे त्याचे भाग्यच म्हणायचे. आता ‘ब्रेकिंग न्यूज’ अशी, की आमच्या हाती मा. सीएम बाई ऊर्फ वहिनीसाहेब आणि या शुकाचा संवाद लागला आहे. या पोपटाने प्रत्यक्ष ‘देवेंद्रा’घरचा चारा खाल्ल्याने तो मानवी वाणीत पूर्णपणे बोलू लागला आहे. या संवादाची झलक आम्ही एक्स्क्लुजिवली तुमच्यासाठीच. वाचा...

पोपट : मी आलोय अध्यक्ष महोदय. मी येथे आपले लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय...मला असं म्हणायचंय अध्यक्ष महोदय...अध्यक्ष महोदय, इकडे लक्ष द्या...अध्यक्ष महोदय...

वहिनीसाहेब : अरे, समजलं समजलं. पण असं रे काय बोलतोस. मी अध्यक्ष नाहीये.
पोपट : अहो, तुमच्या ‘इकडच्यां’कडून घरातही तुम्हाला असंच संबोधताना ऐकलंय मी.
वहिनीसाहेब : इश्श. काही तरीच काय? एक मात्र खरं इकडच्यांची कितीही बडबड चालली तरी घरात माझंच चालतं.
पोपट : अहो, घरात काय, दारातही तुम्ही तुमचंच चालवता, कधी पंतांचं ऐकलंय का? पण स्वारी कुठे दिसत नाहीये, गेलीये कुठे?
वहिनीसाहेब : अहो, स्वारी बिहार मोहिमेवर गेलीये. बिहार प्रांत फत्ते करण्याची जबाबदारी दिल्लीश्वरांनी त्यांच्यावर टाकली आहे.
पोपट : बिहाऱ?. अहो पण सत्ताधाऱ्यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला...
वहिनीसाहेब : अरे महाराष्ट्राची पुन्हा सेवा करायला भल्या पहाटेच ते शपथेवर तयार झाले होते. पण पाहिलं ना काय झालं...
पोपट : याला काही दुष्ट ‘पोपट’ होणे म्हणतात. मी त्यांचा किरकिरीत निषेध करतो.
वहिनीसाहेब : आता तर त्यांचे पक्षातील विरोधकच त्यांच्यावर ‘बारभाईंचे कारस्थान’ वगैरे पुस्तक लिहिणार आहेत म्हणे.
पोपट : त्यांचा पंतांनीच ‘पोपट’ केला, असा आरोप आहे. तुम्ही मात्र अलीकडे ट्विट करून त्यांना चांगलाच टोमणा मारलाय.
वहिनीसाहेब : होच मुळी. मला किनई गप्प बसवतच नाही. मी काही ना काही ट्विट करतेच.
पोपट : अहो, आधीच पंतांना तुमच्या ट्विटने खूप त्रास झालाय. असं सारखं ट्विट करण्यासाठी मनाली योग्य. तिथं थंड वातावरणात बसून मुंबईत रण पेटवण्याचा पराक्रम एका ‘क्वीन’नंं केलाय.
वहिनीसाहेब : अरे पण काय करू, या वर्षा ऋतूत ‘वर्षा’ची फार आठवण येतेय रे. पहाटेची मोहीम फत्ते झाली नाही. ते सारखं आठवतं.
पोपट : या प्रांतात भल्या भल्यांना अशा अटीतटीच्या लढाईत (प)वारांनी जायबंदी केलंय.
वहिनीसाहेब : त्यामुळे माझं कशात लक्ष लागत नाहीये. गाणी गाणंही हल्ली कमी झालंय.
पोपट : ट्विटही कमी करा आता.
वहिनीसाहेब : अरे त्याद्वारे विरोधकांच्या डोळ्यांत मी जणू ‘अमृतांजन’ घालते. आधी त्रास झाला, तरी नंतर महाराष्ट्राचं हितच साधलं जातं.
पोपट : अहो मात्र त्यामुळे पंताचे हितशत्रू पोपटपंची करू लागतात त्याचं काय? (वहिनीसाहेबांच्या डोक्यावर बसतो)
वहिनीसाहेब : नको रे असा डोक्यावर बसू. असेच काही पोपट डोईजड होतात नंतर..
पोपट : मी खरा पोपट आहे. मिरची खाऊनही मिठू मिठूच बोलतो. मी जातोय. पण लक्षात ठेवा
वहिनीसाहेब : काय?
पोपट : (भुर्रकन उडून जात) मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...

- अभय नरहर जोशी
(लेखक लोकमतच्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Conversation of Hon'ble Amritavahinisaheb and 'one' parrot...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.