मराठी वाजवायचं की भोजपुरी? न्यू इयरच्या पार्टीत गाण्यावरून लाठ्या-काठ्यांनी मारहाण, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:47 IST2025-01-03T12:46:32+5:302025-01-03T12:47:22+5:30
मीरा रोड येथे नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान मराठी आणि भोजपुरी गाण्यावरून दोन गटात हाणामारी झाली.

मराठी वाजवायचं की भोजपुरी? न्यू इयरच्या पार्टीत गाण्यावरून लाठ्या-काठ्यांनी मारहाण, एकाचा मृत्यू
Mira Road Crime: मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडमध्ये नववर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषिक नागरिकांवर अन्यायाच्या घटना समोर येत आहेत. अशातच मीरा रोडमध्येही मराठी विरुद्ध भोजपुरी गाण्यावरुन झालेल्या वादात एकाला जीव गमवावा लागला आहे. नववर्षाच्या स्वागताच्या वेळी झालेल्या हाणामारीत एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची स्थानिक पोलिसांनी नोंद घेत तपास सुरु केला आहे.
मीरा रोडमध्ये न्यू इयर पार्टीदरम्यान भोजपुरी गाणे वाजवण्यावरून वाद झाला. मराठी गाणे वाजवायचे की भोजपुरी गाणे वाजवायचे यावरून सोसायटीमधल्या रहिवाशांमध्ये झालेल्या वादाला काही वेळातच हिंसक वळण लागले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. म्हाडाच्या गृहनिर्माण संकुलात नववर्षाचा जल्लोष सुरू होता. म्युझिक सिस्टीमचा जोरात आवाज आणि गाण्यावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. काही लोकांनी दुसऱ्या गटातील सदस्यांवर बांबू आणि लोखंडी रॉडने हल्ला सुरू केल्याने वादाने हिंसच वळण घेतले. यामध्ये राजा पेरियार या तरुणाचा जीव गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष जाधव, अमित जाधव, त्याचे वडील प्रकाश जाधव आणि प्रमोद यादव यांनी राजा पेरियार याच्यावर हल्ला केला. राजा पेरियार याच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. डोक्यावर काठीने वार केल्याने तो गंभीर जखमी झाले. पेरियारचा सहकारी विपुल राय हाही हल्लेखोरांच्या निशाण्यावर आला. हल्लेखोरांनी विपुल राय यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या भांडणात पेरियार आणि राय गंभीर जखमी झाले होते.
दोन्ही जखमींना मुंबईतील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गुरुवारी उपचारादरम्यान राजा पेरियार याचा मृत्यू झाला. विपुल राय यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपी आशिष जाधव, अमित जाधव, प्रकाश जाधव, प्रमोद यादव यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
काशिमिरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मंगळवारी झालेल्या भांडणात २३ वर्षीय राजा पेरियार गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. आज त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पार्टीत अनेक लोक मराठी गाण्यांवर नाचत होते. यावेळी आणखी काही लोकांनी भोजपुरी गाणी वाजवण्याचा आग्रह धरला. काही लोक पूर्णपणे दारूच्या नशेत होते. त्यांच्यात वाद सुरू झाला. गाण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला."