Mira-Bhiandar Flyover: मिरा-भाईंदरच्या पुलाच्या डिझाईनला आर. ए. राजीव यांच्या काळात मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:31 IST2026-02-05T10:30:29+5:302026-02-05T10:31:51+5:30

Mira-Bhiandar flyover controversy: महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेला मिरा-भाईंदर उड्डाणपूल सध्या मोठ्या टीकेचा विषय ठरला आहे. गोल्डन नेस्टजवळील दोन लेनच्या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

Controversial Mira-Bhiandar Flyover Approved During Maha Vikas Aghadi, MMRDA Faces Criticism Over Design | Mira-Bhiandar Flyover: मिरा-भाईंदरच्या पुलाच्या डिझाईनला आर. ए. राजीव यांच्या काळात मान्यता

Mira-Bhiandar Flyover: मिरा-भाईंदरच्या पुलाच्या डिझाईनला आर. ए. राजीव यांच्या काळात मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मिरा भाईंदर येथील विचित्र रचनेमुळे वादग्रस्त ठरलेल्या पुलावरून एमएमआरडीएला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत असताना या वादग्रस्त पुलाची मान्यता महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आल्याचे समोर आले आहे. एमएमआरडीएचे तत्कालीन महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी या कामाला मान्यता दिली होती.

एमएमआरडीएने त्यावेळी दहिसर ते मिरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेसोबत एकाच पिलरवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचा प्रस्ताव सिस्त्रा सीईजी एसएमसीआयपीएल या सल्लागाराने डिसेंबर २०१९ मध्ये एमएमआरडीएला दिला होता. त्यानुसार या प्रकल्पात एकूण चार उड्डाणपूल उभारण्यात येणार होते. त्याला जानेवारी २०२० मध्ये मान्यता देण्यात आली होती. तसेच प्रकल्पाच्या कामासाठी २१७ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता, अशी माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. dतर या प्रकल्पाचे डिझाईन सल्लागाराने मार्च २०२१ मध्ये सादर केले होते. एमएमआरडीएने हा प्रस्ताव मान्यतेसाठी मे २०२१ मध्ये सादर केला होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. बिल्डरला जोडून काम मिळावे म्हणून हे काम वाढवण्यात आले. मात्र, त्यावेळी त्याचे डिझाईन कोणीही गंभीरपणे बघितले नाही हेच यातून स्पष्ट होत आहे. या प्रकल्पावर पी.आर.के. मूर्ती आणि प्रमोद अहुजा हे प्रकल्प संचालक होते, तर मुख्य अभियंता एम. बी. बसवराज हे होते.  

‘त्यांच्या’ नावाच्या आता पाट्या लावा

या प्रकल्पातील दोन उड्डाणपुलांचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या चित्रफिती समाजमाध्यमातून व्हायरल झाल्या. त्यानंतर एमएमआरडीएवर टीकेची झोड उठविण्यात सुरुवात झाली. ज्यांच्या काळात हे काम झाले त्या बिल्डर, अधिकारी यांच्या नावाच्या पाट्या त्या ठिकाणी लावा म्हणजे लोकांना खरे काय ते कळेल अशी टीका होत आहे. 

दोन लेनच्या रस्त्यावर अपघाताची भीती

दरम्यान, हा तिसरा पूल शिवार गार्डन ते गोल्डन नेस्टजवळ भाईंदर पूर्व असा उभारण्यात आला आहे. त्यावर दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी मिळून एकूण चार मार्गिका आहेत. त्यातील भाईंदर पूर्वेला गोल्डन नेस्टजवळ हा उड्डाणपूल उतरतो, त्या भागात साधारण २०० मीटर अंतरापूर्वी तो दोन लेनचा करण्यात आला आहे. त्यातून अचानक रस्ता दोन लेनचा झाल्याने वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच रस्ता ज्या ठिकाणी दोन लेनचा केला आहे, तिथे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या अधिकाऱ्यांनी या डिझाईनला मान्यता दिली त्यांनी प्रत्यक्षात रस्ता कसा होणार आहे हे पाहिले होते की नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

एमएमआरडीएचा खुलासा काय?

एमएमआरडीएने भाईंदर पूर्वेला एकच मार्गिका उतरविण्यात येणार असून, त्यानुसार पुलाचे डिझाईन करण्यात आल्याचा खुलासा केला आहे, तर या पुलाच्या दोन मार्गिका ज्या भागात संपतात तेथून पुढे भाईंदर पश्चिमेला जाणाऱ्या प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी एक लेन असलेल्या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण एमएमआरडीएकडून देण्यात आले होते.

मांडली तलावापर्यंतच्या विस्तारित पुलाचा प्रस्ताव सल्लागाराकडून सादर 

या पुलाचा विस्तार आता भाईंदर पश्चिमेला मांडली तलावापर्यंत करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. हा विस्तारित मार्ग प्रत्येकी एका लेनचा उभारला जाणार असून, त्यासाठी १९३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गोल्डन नेस्ट ते भाईंदर पश्चिमेकडील मांडली तलाव असा मार्ग उभारण्यासाठी सिस्त्रा सीईजी एसएमसीआयपीएल या सल्लागाराने १० जानेवारीला एमएमआरडीएला प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सध्याच्या मार्गाचा पुढे पश्चिमेला ९७० मीटरपर्यंत विस्तार केला जाईल.पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून हा पूल जाईल. त्याला मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेशी समन्वय साधून हे काम होईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title : मीरा-भायंदर फ्लाईओवर डिजाइन आर.ए. राजीव के कार्यकाल में स्वीकृत: विवाद

Web Summary : विवादास्पद मीरा-भायंदर फ्लाईओवर डिजाइन को आर.ए. राजीव के कार्यकाल में एमएमआरडीए आयुक्त के रूप में मंजूरी दी गई थी। परियोजना को डिजाइन दोषों के कारण आलोचना का सामना करना पड़ा, जिससे दुर्घटनाएं हो सकती हैं। चिंताओं के बावजूद विस्तार योजनाएं चल रही हैं।

Web Title : Mira-Bhayandar Flyover Design Approved During R.A. Rajiv's Tenure: Controversy Erupts

Web Summary : The controversial Mira-Bhayandar flyover design was approved during R.A. Rajiv's tenure as MMRDA commissioner. The project faced criticism due to its design flaws, potentially causing accidents. Expansion plans are underway despite concerns.