Congress's Elgar against Modi government's farmers' laws; Massive Farmers Rescue Rally on 15th October | मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार; १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली

मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार; १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली

ठळक मुद्देराज्यातील १० हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये LED Screen, LCD प्रोजेक्टर स्क्रीन, टीव्ही, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून व्हर्चुअल सभांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे मंजूर केले आहेत. त्याचा आम्ही काळे कायदे म्हणून उल्लेख करतो. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरु केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे १० हजार गावात एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. सोशल मीडियावरही ही रॅली पाहता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली असून ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

केंद्र सरकारने लादलेल्या या काळ्या कायद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही या विषयावर बैठक झाली आहे. भाजपा सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतक-यांवर हे कायदे लादले आहेत. उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणलेल्या या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून शेतक-यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे, असे गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले. 

केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरु असून १५ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता शेतकरी बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बचाव रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यातील पाच ठिकाणी असणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटर कनेक्ट असून पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दुसरा कार्यक्रम औरंगाबाद येथे होणार असून या रॅलीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तर अमरावती येथील शेतकरी बचाव रॅली महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत व पुनवर्सन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न होणार आहे. तर कोकण विभागातील रॅली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझ्झफर हुसेन यांच्या उपस्थितीत होणार आहे.

१० हजारपेक्षा जास्त गावात एकाचवेळी आयोजन 
राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये LED Screen, LCD प्रोजेक्टर स्क्रीन, टीव्ही, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून व्हर्चुअल सभांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या म्हणजेच INCMaharashtra च्या युट्युब, फेसबुक, ट्विटर या सर्व समाज माध्यमांवर (facebook.com/incmaharashtra,  twitter.com/incmaharashtra, youtube.com/incmaharashtra) या शेतकरी बचाओ मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेसने याआधी २६ सप्टेंबर रोजी- #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम राबविली होती.

राज्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतक-यांनी काळे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे व्हीडीओ, फोटो, संदेश सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यू ट्यूबवर पोस्ट केले. या ऑनलाईन मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. २ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यव्यापी किसान मजदूर बचाव दिवस पाळण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला ‘किसान-मजदूर बचाओ दिवस’ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाळला. राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन तसेच मोर्चे काढून शेतकरी काळे कायदे मागे घेण्याची मागणी केली. राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी हे आंदोलन करण्यात. राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकार हे काळे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेसचा हा संघर्ष सुरुच राहील, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress's Elgar against Modi government's farmers' laws; Massive Farmers Rescue Rally on 15th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.