नवी दिल्ली : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस ही उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशीच युतीबाबत चर्चा करणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितले. तसेच उपआघाडी कोणाशी करायची, याचा निर्णय त्यांच्यावरच सोडण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री फेडणार; कृषिमंत्रीही मदतीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उद्धव सेनेशी जवळीक वाढल्याच्या मुद्द्यावर चव्हाण म्हणाले की, हा त्यांचा घरगुती विषय आहे. एखादा व्यक्ती काँग्रेसच्या विचारांना पूर्णपणे विरोध करणारा असेल, तर आम्ही त्या युतीला आक्षेप घेऊ; अन्यथा त्या दोघांनी एकत्र येणे, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत. ते आपल्या सभांमध्ये मोठी गर्दी खेचतात. मात्र, त्याचे मतदानात रुपांतर होत नाही. त्यामुळे सध्याच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणवत नाही.
शशी थरूर हे परदेशात पाठवण्यात आलेल्या प्रतिनिधीमंडळाचा भाग होते आणि एक सदस्य म्हणून सरकारच्या भूमिकेचे समर्थन करणे, त्यांचे कर्तव्य होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.