“जे होईल ते पाहा, जे मिळेल ते घ्या, अन्यथा घरी आराम करा”; शिंदे-अजितदादांना कुणाचा टोला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:14 IST2024-12-12T18:13:35+5:302024-12-12T18:14:07+5:30
Congress Vijay Wadettiwar News: परभणीतील प्रकाराकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यामुळे परभणीत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला सरकार जबाबदार आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“जे होईल ते पाहा, जे मिळेल ते घ्या, अन्यथा घरी आराम करा”; शिंदे-अजितदादांना कुणाचा टोला?
Congress Vijay Wadettiwar News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबतमहायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्यांनी यासंदर्भात खोचक टोला लगावला आहे.
जे जे होते ते ते पाहा, अशी स्थिती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची झालेली आहे. जे जे देतील ते ते घ्या, जे जे मिळेल तेते घ्या, नाही तर तुम्ही घरी आराम करा, असा खोचक टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अजिबात बार्गेनिंग पॉवर नाही. बार्गेनिंग करू शकत नाही, ही स्थिती आताच्या भाजपा सरकारने आणली आहे. ईव्हीएममच्या भरवशावर त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलेले आहे. त्यामुळे यांना दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही. बाहेर पडू शकत नाहीत. यांची स्थिती धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी झालेली आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार निशाणा साधला.
तेव्हा सरकारने लक्ष घातले असते, तर...
परभणीत आंदोलन चिघळले. जमावबंदी लागू करण्यात आली. या घटनेवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा प्रकार घडला, तेव्हा सरकारने लक्ष घातले असते, तर हा प्रसंग टाळता आला असता. या प्रसंगाला सामोरे जायची आवश्यकता पडली नसती. परंतु, सरकारने त्या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे परभणीत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला सरकार जबाबदार आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अनपेक्षित यश मिळाले. सत्ता अमर्याद झाली आणि ती डोक्यात गेली. तसेच उपमुख्यमंत्री नंबर २ वर कोण आणि नंबर ३ वर कोण, हे मुख्यमंत्री यांनी ठरवावे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.