“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:37 IST2025-10-06T15:34:39+5:302025-10-06T15:37:17+5:30
Vijay Wadettiwar News: आमच्या समाजावर अन्याय होतोय आम्ही बोलायचे नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला.

“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
Vijay Wadettiwar News: एकूणच समर्थन मिळाल्यामुळे देव झाल्याची भावना मनोज जरांगे पाटील यांच्या मनात झालेली आहे. त्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे, माझ्या एवढा मोठा नेता कोणीच नाही. अशा पद्धतीने ते वागत आहे. संपून टाका परवा करू नका, मराठ्याच्या मुलांना हुसकवण्याचे काम करत आहे. लोकांची दिशाभूल करण्याचे काम मनोज जरांगे करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर सगळ्या समाजाने उभे केले आहे. काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाला दिले हे लपून राहिलेले नाही. माझी आणि छगन भुजबळ यांची कधीच बैठक झालेली नाही. आमच्या समाजावर अन्याय होतोय आम्ही बोलायचे नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला.
ओबीसीमधूनच आरक्षण द्या, अशी मागणी चुकीची
शासनाचा जीअर महाराष्ट्रातील ३७४ जातींवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे आम्ही १० ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहोत. या जीआरमधील पात्र शब्द वगळावा. आधी हा शब्द नव्हता, नंतरच्या एक तासात जीआरमध्ये पात्र शब्द टाकण्यात आला. ऑनलाइन सिग्नेचर घेण्यात आले. हा सगळा निर्णय दबावात झालेला आहे, एखादा प्रस्थापित समाज ज्याच्याकडे सगळे काही आहे. सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, यात जर काही गरीब लोक असलेले त्याच्यासाठी ईडब्ल्यूएसची व्यवस्था आहे. त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्या, अशी मागणी चुकीची आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमचा जीव गेला तरी चालेल. मात्र ओबीसी आरक्षण लढा सुरूच राहील. आमच्या जीवाला जर धक्का लागला तर, याची सर्वस्व जबाबदारी जरांगे यांची राहील. आम्ही लिहून ठेवू, जीव गेला तर जरांगेला फाशी द्या, असे सांगत वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, सगळे ओबीसी मराठा विरुद्ध आहे, असे दाखवण्याचा ढोंग करत आहे. मुळासकट संपवा परिणामाची चिंता करू नका, असे ते म्हणतात. जरांगे यांना नेमके काय सांगायचे आहे. मराठा तरुणांच्या हातात बॉम्ब द्यायचे आहे का? ओबीसी नेत्यांच्या अंगावर जाऊन त्यांना मारून टाका असे जरांगेना म्हणायचे आहे का? सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे आवरण्याची गरज आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.