"कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी"; फाटक्या साड्या वाटपावरून काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 01:21 PM2024-03-12T13:21:14+5:302024-03-12T13:49:47+5:30

Congress Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांनी फाटक्या साड्या वाटपावरून सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. 

Congress Vijay Wadettiwar Slams maharashtra government Over ration saree | "कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी"; फाटक्या साड्या वाटपावरून काँग्रेसचा घणाघात

"कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी"; फाटक्या साड्या वाटपावरून काँग्रेसचा घणाघात

महाराष्ट्र सरकारने 'अंत्योदय' शिधापत्रिका असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या महिलांना मोफत साड्या देण्याची योजना सुरू केली. हा उपक्रम 2023 ते 2028 या कालावधीत राबवला जाणार आहे. सणांच्या काळात साड्यांचं वाटप करण्याचा योजनेचा उद्देश आहे. याचा सर्व खर्चही राज्य सरकार करत आहे. मात्र आता महिलांना देण्यात आलेल्या साड्या या जुन्या आणि फाटक्या असल्याचं समोर आलं आहे. यावरून काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला? गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला?, कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी" असं म्हणत निशाणा साधला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी फाटक्या साड्या वाटपावरून सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. 

"फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला ? गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला? राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे."

"२०२३-२०२४या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी ३५५रुपये दिले आहे. स्वस्त धान्य दुकानातून या साड्यांचे वाटप होत आहे. या साड्यांच्या निमित्ताने महिलांना या सरकारने रांगेत लावले. इतका सारा त्रास सहन करून हाती आलेल्या साड्या पाहिल्या तर काय त्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी, कळंब, मारेगावसह अनेकानेक तालुक्यांत या घटना समोर आल्या. या महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.’"

"कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी आहे. म्हणून तर दोन दिवसांपूर्वी नागपुरातील रेशीमबागेत महिला कामगारांना किट वाटपाच्या नावाखाली रांगेत ठेवले. सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून वाटप बंद केले. सरकारचा फोलपणा लक्षात आल्याने कामगार महिला चिडल्या. संतापल्या..! चेंगराचेंगरी झाली आणि एका मायमाऊलीचा जीव गेला. दुसऱ्या दिवशी वाटप बंद केले. कुठे रेशनवर मायमाऊलींना फाटक्या साड्या दिल्या जातात, कुठे किचन किटच्या नावावर जीव जातात. जाहिरातबाजीसाठी महिला भगिनींची चेष्टा का?" असं विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: Congress Vijay Wadettiwar Slams maharashtra government Over ration saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.