गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:39 IST2025-08-10T10:37:28+5:302025-08-10T10:39:33+5:30
Congress Vijay Wadettiwar News: निवडणूक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजपा नेते गडकरींना जाब विचारणार का? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
Congress Vijay Wadettiwar News: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका दीर्घ पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’चा थेट आरोप केला. राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप करत बोगस मतदारांबाबत मोठा दावा केला. राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलेले असल्याचा दावा केला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेऊन काँग्रेसने भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे.
आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे? निवडणुक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजपा नेते गडकरींना जाब विचारणार का? मतचोरी होते, मतदारयादीत घोळ केले जातात याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गंभीर आरोप केला की त्यांच्या निवडणुकीत मतदारसंघातील ३,५०,००० नावे वगळण्यात आली. विशेष म्हणजे जी नावे वगळण्यात आली ते त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते. त्यांच्या भाच्याचे नावही वगळण्यात आले, असे गडकरी म्हणाले, असे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत भाजपावर हल्लाबोल केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का?
विजय वडेट्टीवार पुढे म्हणतात की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांची मत जर मतदारयादीतून गायब होत असतील तर इतरांचे काय? कुठे मतदार वाढवून दाखवले जात आहे तर कुठे मतदार गायब केले जात आहे, मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का? अजून पुरावे मागणार की माफी मागणार? अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.
नितीन गडकरी नेमके काय म्हणाले?
निवडणूक लढवत असताना साडेतीन लाख नावे, जे माझे मतदार आहेत, त्यांची नावे वगळण्यात आली, हे माझ्या लक्षात आले. या वगळलेल्या नावांत माझे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य होते, असे अनेक लोक होते. ते माझ्याविरोधात षडयंत्र होते का, मला कमकुवत करण्यासाठी नावे वगळण्यात आली होती का, असे आरोप मी कुणावरही करणार नाही. परंतु, माझ्या मतदारसंघातील साडेतीन लाख लोकांची नावे वगळण्यात आली होती, हे सत्य आहे, असे नितीन गडकरी एका व्हिडिओत सांगताना दिसत आहेत. हा व्हिडिओ विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत आहेत, असे दिसत आहे.
दरम्यान, बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली. तर मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आम्हालाही ते मान्य आहे. आमची इतक्या वर्षापासून ते सांगत आहोत, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मला वाटते की, राहुल गांधीच्या मेंदूची चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे, म्हणून ते नेहमी खोटे बोलत आहेत, ते जनतेचे जनमत चोरत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.