“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:25 IST2025-11-10T12:25:02+5:302025-11-10T12:25:02+5:30
Local Body Elections 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती राहणार की तुटणार यावर चर्चा रंगत आहेत.

“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
Local Body Elections 2025: आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी असे विधान करत उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेण्याबाबत मोठे संकेत दिले. गेल्या काही महिन्यात विविध निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू अनेकदा एकत्र आले. परंतु, अद्यापही निवडणुकीतील युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. यातच मनसेचामहाविकास आघाडीत सामील करून घ्यायला काँग्रेस पक्ष फारसा उत्सुक नसल्याचे पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित राहणार की, राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी असणार, हेही अद्याप अस्पष्ट आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या महाराष्ट्र निर्माण सेनेची २२७ पैकी १२५ जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद असल्याचा अंदाज समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरेंकडील अनेक नगरसेवक शिवसेना शिंदे गटात केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यातच मनसेला सोबत घेण्याचा प्रश्नच नाही, मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, 'ते' समविचारी नव्हे!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती राहणार की तुटणार यावर चर्चा रंगत आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी वेगळेच मत व्यक्त केले. ते म्हणतात, 'मनसेला सोबत घेण्याचा प्रश्नच नाही, मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही'. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेससोबत मनसे राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यस्तरावरूनच जर महाविकास आघाडीत मनसेला सहभागी केल्यास वड्डेटीवारांच्या 'समविचारी'चे काय होईल? वडेट्टीवारांचा मनसेवरील रोष राज्यव्यापी आहे की त्यांच्या जिल्हा डोळ्यांसमोर ठेवून, अशीही चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे, अशी कुजबुज आहे.
दरम्यान, मनसेकडून जवळपास मुंबईतील २२७ पैकी १२५ जागांची यादी काढण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसेकडे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत. यामध्ये बहुतांश माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी या मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागांचा समावेश आहे. युती झाल्यास यामध्ये मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही पक्षांकडून आपली ताकद असलेल्या जागा या बाजूला काढल्या जात आहेत, असा कयास बांधला जात आहे.