“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:11 IST2025-11-28T15:10:48+5:302025-11-28T15:11:16+5:30
Congress Vijay Wadettiwar News: ओबीसी बांधवांना संवैधानिक प्रतिनिधित्व तातडीने मिळावे, यासाठी भाजपाने केवळ घोषणाबाजी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका
Congress Vijay Wadettiwar News: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे आमचे लक्ष होते. न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी ओबीसींच्या जागांवरील टांगती तलवार मात्र कायम राहिलेली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देताना, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचा अर्थ, ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या वर गेले आहे, त्या जागांवर निवडणूक होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील केलेले सगळे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत. ही सपशेल बनवाबनवी आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
भाजपने बनवाबनवी करून ओबीसी बांधवांना मूर्ख बनवले
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तरी ओबीसी जागांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या छायेखाली राहणार आहे. भाजप सरकार सातत्याने आम्ही ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत होते. मात्र, आजच्या परिस्थितीमुळे हे सर्व दावे फोटे ठरले आहेत. ओबीसींसाठी दिलेले २७ टक्के आरक्षण गेले कुठे? याचे उत्तर भाजपाने द्यावे. निवडणुका घेण्यास सांगूनही निकाल न्यायालयावर अवलंबून ठेवणे म्हणजे ओबीसी बांधवांची राजकीय दिशाभूल करणे आहे. भाजपाने केवळ घोषणांची बनवाबनवी करून ओबीसी बांधवांना मूर्ख बनवले, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, ओबीसी बांधवांना त्यांचे संवैधानिक प्रतिनिधित्व तातडीने मिळावे, यासाठी भाजपाने केवळ घोषणाबाजी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.