मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:05 IST2025-10-11T18:10:58+5:302025-10-11T19:05:46+5:30
Kalyan Congress News: काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्त मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसवलेला आक्षेपार्ह सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून भररस्त्यात साडी नेसवल्याची धक्कादायक घडना कल्याण येथे घडली होती. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज कल्याणच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी मामा पगारे यांची भेट घेत त्यांची चक्क खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली.

मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्त मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसवलेला आक्षेपार्ह सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून भररस्त्यात साडी नेसवल्याची धक्कादायक घडना कल्याण येथे घडली होती. या घटनेबाबत राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच प्रत्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेची दखल घेत मामा पगारे यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली होती. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज कल्याणच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी मामा पगारे यांची भेट घेत त्यांची चक्क खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. तसेच त्यांचा सत्कारही केला. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई व कल्याणचे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते पगारे मामा यांच्यावर हल्ला करणारी प्रवृत्ती ही मनुवादी आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई व कल्याणचे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते पगारे मामा यांच्यावर हल्ला करणारी प्रवृत्ती ही मनुवादी आहे. या मनुवादी वृत्तीला न घाबरता चोख उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हात लावण्याचे धाडस कोणी केले तर त्याच्यापाठीमागे सर्वशक्तिनीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली. यावेळी पगारे मामा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी खांद्यावर उचलून स्टेजवर नेले आणि देशाचे संविधान, गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन सत्कारही करण्यात आला.
उल्हासनगर काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड, गणेश पाटील, माजी खासदार सुरेश टावरे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, अजिंक्य देसाई, कल्याण शहराध्यक्ष सचिन पोटे, राजाभाऊ पातकर, उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे आदी उपस्थित होते.