Congress Harshwardhan Sapkal: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने वादात सापडले आहेत. औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता तेवढेच देवेंद्र फडणवीस हे क्रूर आहेत, असं सपकाळ यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानावरून भाजपचे आमदार आज विधिमंडळात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या आमदारांकडून करण्यात आली. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली.
"मुख्यमंत्र्यांबद्दल हर्षवर्धन सकपाळ यांनी जे वक्तव्य केलं आहे ते आपल्या निदर्शनास आलं तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे," असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात म्हटलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सरकारकडून काही कारवाई केली जाते का आणि कारवाईला काँग्रेसकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वादानंतर सपकाळ काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपकडून टीका होऊ लागल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पलटवार केला आहे. "मागच्या आठवड्यातील बीडमध्ये पार पडलेल्या सद्भावना पदयात्रेच्या वेळीच मी स्पष्ट केले होते, माझ्या नियुक्ती नंतर माझ्या वक्तव्यांवर भाजपने विरोध सुरू केला आहे, मला अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. फडणवीसांवर केलेली टिप्पणी तंतोतंत खरी असल्याने भाजपवाल्यांनी आज आकांडतांडव करून माझ्यावर बेताल वक्तव्य सुरू केली आहेत," असं सपकाळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, "काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्याने हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न आहे," असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आला आहे.