congress sachin sawant slams yogi government over Hathras Gangrape case | Hathras Gangrape : "भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा"  

Hathras Gangrape : "भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा"  

मुंबई - हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. पीडित मुलीवर सकाळी अंत्यसंस्कार करावेत, मुलीचे अंत्यदर्शन घेऊ द्यावे, तिचा मृतदेह घरी नेऊ द्यावा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. मात्र आधीपासूनच आरोपाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी धुडकावून लावली आणि कडेकोट बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावरून काँग्रेसनेउत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा" असं काँग्रेसने म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. "भारतमातेच्या एका मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. दहा दिवसांनंतरही तक्रार दाखल केली नाही. तिला दिल्लीतील रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर केला आणि पोलिसांनी मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. याला जंगलराज म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

"उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं", राहुल गांधींचा हल्लाबोल

"उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं" असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सरकारने म्हटलं की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिलं. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच प्रियंका गांधी यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील कायदे व्यवस्था बिघडल्याचं म्हटलं आहे. 

 तरुणीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ 

हाथरसच्या चंदपा परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली होती. गावातील चार तरुणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला मारहाण केली आणि तिची जीभ कापली. तिची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये तिला गंभीररित्या दुखापत झाली असून अलीगढच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगून नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली होती. 

"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश"

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापलं आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 'एम्स'ने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसनेभाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'एम्स'च्या अहवालामुळे भाजपचं तोंड काळं झालं आहे अशी जोरदार टीका सचिन सावंत यांनी केली आहे. "एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालं आहे. भाजपाच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तेश्वर पांडे यांना उगाच स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली नाही. मुंबई पोलिसांना ज्या वाईट पद्धतीने बदनाम करण्यात आलं, महाराष्ट्राचा अपमान केला गेला. ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपाला माफ करणार नाही"असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.


 

Read in English

English summary :
congress sachin sawant slams yogi government over Hathras Gangrape case

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress sachin sawant slams yogi government over Hathras Gangrape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.