"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:49 IST2025-11-20T09:45:49+5:302025-11-20T09:49:58+5:30
१० वर्षांपासून न झालेल्या स्थानिक निवडणुकांचा मुद्दा वकिलांनी मांडलाच नाही असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
Prithviraj Chavan: शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावरील कायदेशीर लढाईतील निर्णय सुप्रीम कोर्टाने थेट जानेवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलल्याने ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय धक्का बसला आहे. चिन्हाबाबत निर्णय न झाल्यामुळे ठाकरे गटाला मशाल (Mashaal) चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांना चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. एका मिनिटांमध्ये हा खटला संपला, निवडणुका झाल्या नाहीत हा मुद्दा मांडायला हवा होता, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने वारंवार केली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणीची तारीख २०२६ पर्यंत निश्चित केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यात पक्षाचे मूळ धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर बाजूवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडणे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर टीमच्या युक्तिवादात त्रुटी राहिल्या यावर बोट ठेवले आहे.
"शिवसेनेचा जो खटला झाला त्यावेळी त्यांनी पुन्हा चुकीचा युक्तिवाद केला. शिवसेनेच्या वकिलाने चुकीचे मुद्दे मांडले. एका मिनिटामध्ये हा खटला संपला. त्यामुळे त्यांनी आम्ही जानेवरीमध्ये ऐकतो असं म्हटलं म्हणजे सगळ्या निवडणुका संपल्यानंतर. आम्ही ज्या स्थानिक निवडणुका लढणार आहोत त्या दहा वर्षे झालेल्या नाहीत हा मुद्दा त्यांनी मांडायला हवा होता. ७३ आणि ७४ ची घटना दुरुस्ती भाजप सरकारने मोडून काढलेले आहे हे सांगायला हवं होतं. त्यामुळे या निवडणुका होण्यापूर्वी तुम्ही आम्हाला चिन्हाबाबत लवकर निर्णय द्या असंही म्हणायला हवं होतं. पण ही बाजू मांडली गेलेली नाही," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला येत्या निवडणुकीत पुन्हा धनुष्यबाण नसतानाही भाजप-शिंदे-अजित पवार महायुतीशी दोन हात करावे लागणार आहेत.