“मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही”; काँग्रेसचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 04:28 PM2023-09-27T16:28:03+5:302023-09-27T16:31:27+5:30

Maharashtra Politics: मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर असल्याचा दावा करत सामान्य जनतेवर कठोर निर्बंध लादले जात आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

congress nana patole reaction over restrictions in mantralaya entry for state people | “मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही”; काँग्रेसचे सरकारवर टीकास्त्र

“मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही”; काँग्रेसचे सरकारवर टीकास्त्र

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यातील शिंदे सरकारला केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली आहे. केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे, मुठभर लोकांसाठी नाही. आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे आणि सुरक्षेचे कारण पुढे करून सर्वसामान्य जनतेला मात्र मंत्रालयात प्रवेश नाकारला जात आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गुजरातमध्ये एक हुकूमशाही व्यवस्था सुरु झाली तीच व्यवस्था २०१४ पासून केंद्रात आली आणि आता हीच हुकूमशाही व्यवस्था महाराष्ट्रात आली आहे. मंत्रालयात दररोज हजारो लोक आपल्या कामांसाठी येतात, स्थानिक प्रशासनाकडे हेलपाटे घालूनही त्यांचे काम होत नाही. मंत्री फक्त आश्वासने देऊन मोकळे होतात पण त्याची कार्यवाही होत नाही म्हणून शेवटी लोक मंत्रालयात येतात, काहीजण आत्महत्या करण्याचा प्रयत्नही करतात. कोणीही आत्महत्या करु नये हीच आमची भूमिका आहे पण लोक जीव देण्यापर्यंत का जातात? याचा सरकारने विचार करायला हवा, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

शासन आपल्या दारी म्हणत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी

शासन आपल्या दारी म्हणत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी व केवळ जाहीरातबाजी केली जात आहे प्रत्यक्षात या कार्यक्रमातून काही साध्य होत नाही म्हणून तर लोक मंत्रालयात येतात. काम होत नाही म्हणूनच आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलतात, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मर्यादित करणे त्यासाठी जाचक अटी घालणे ही हुकूमशाहीप्रवृत्ती आहे. हे जाचक नियम लागू न करता सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश सुलभ करण्यावर सरकारने भर द्यावा. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मोठ्या रांगा लागतात, त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी नाहीत, जनता ही राजा आहे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा प्रकार संताप आणणारा आहे

आजच्या मंत्रालयाला पूर्वी सचिवालय नाव होते, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्याचे नाव बदलून मंत्रालय असे केले, त्यामागे सर्वसामान्य जनतेला या वास्तूशी जोडण्याचा त्यांचा उदात्त हेतू होता. सरकार जनतेसाठी आहे, मंत्री महोदयांनी ते प्रशासनाच्या मदतीने चालवणे अपेक्षित आहे. असे असताना केवळ सुरक्षेचे कारण पुढे करुन व गर्दी कमी करायची यासाठी प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा प्रकार संताप आणणारा आहे, असे सांगत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, राज्यातील सरकारने एका व्यक्तीला तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाठ किमतीला कंत्राटाचे वापट करतो. जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांना देऊन उधळपट्टी सुरु आहे. अशा दलालांना मंत्रालयात मुक्त वावर आहे आणि सर्वसामान्य जनतेला निर्बंध लावले जात आहेत. सरकारच्या या दलालाचा भांडाफोड काँग्रेस पक्ष लवकरच करणार आहे, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. 
 

Web Title: congress nana patole reaction over restrictions in mantralaya entry for state people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.