महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 19:14 IST2025-07-06T19:14:07+5:302025-07-06T19:14:47+5:30

Maharashtra Municipal Elections 2025: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात आणि परिस्थितीनुसार निवडणुकीनंतर आघाडीबाबत विचार करावा, असा पक्षातील नेत्यांचे सूर असल्याचे म्हटले जात आहे.

congress likely preparing for the maharashtra municipal elections 2025 on its own and will rahul Gandhi give a blow to sharad pawar and uddhav thackeray | महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

Maharashtra Municipal Elections 2025: आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात महायुतीत प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याचा कयास बांधला जात आहे. यातच राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार की, फक्त उद्धव ठाकरेंशी युती करणार, यावरूनही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या घडामोडी सुरू असतानाच काँग्रेसमधून मात्र आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत, असा सूर उमटत असल्याचे बोलले जात आहे. 

ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मेळाव्याला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड आणि लहान मित्रपक्षांचे काही नेते उपस्थित होते, पण काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. मराठी-हिंदीच्या वादात न पडण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसले. उद्धव-राज भविष्यातही एकत्र आले तर महाविकास आघाडी राहील का आणि त्यात काँग्रेस राहील का, हा विषय आता चर्चिला जात आहे. यातच ग्रामीण आणि निम-शहरी भागांत काँग्रेसने पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वबळावर लढाव्यात. निसटून चाललेला एकेक भाग पुन्हा काबीज करावा, असे काँग्रेसमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे, असे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात

एकेकाळी राज्यात सत्ता असलेली काँग्रेस सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यासह विरोधी महाविकास आघाडीचा एक घटक आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण करत असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचा असे वाटते की, काँग्रेसने दुहेरी दृष्टिकोन स्वीकारण्याचा विचार करावा, प्रथम स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे लढून, संघटनात्मक ताकद तपासावी आणि नंतर आवश्यक असल्यास निवडणुकीनंतर आघाडी करण्याचा विचार करावा. परंतु, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. काँग्रेसमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पक्षाने महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढावाव्यात आणि निवडणुकीनंतर आघाडीसाठी चर्चेची दारे खुली करावी, हे मॉडेल मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक यांसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरी केंद्रांसह महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकारले पाहिजे.

आगामी निवडणुका कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याचे एक साधन

शिवाजीराव मोघे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याचे एक साधन आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी जास्तीत जास्त जागा लढवाव्यात असे सर्वांनाच वाटते. स्थानिक निवडणुका या केवळ महानगरपालिका, संस्थांच्या निवडणुका नाहीत, तर महाराष्ट्रात पक्षाच्या पुनरागमनासाठी महत्त्वाच्या आहेत, असेही काहींचे मत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्याशी निवडणुकीनंतर आघाडी करण्याची शक्यता नाकारत नाही. परंतु काँग्रेसला प्रथम स्वतःचे गमावलेले स्थान परत मिळवावे लागेल. 

दरम्यान, ग्रामीण आणि निम-शहरी भागात भाजपाच्या वाढत्या प्रभावाबद्दल काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका, २४८ नगरपरिषदा, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत.

 

Web Title: congress likely preparing for the maharashtra municipal elections 2025 on its own and will rahul Gandhi give a blow to sharad pawar and uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.