­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 08:11 AM2021-09-26T08:11:08+5:302021-09-26T08:11:59+5:30

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाण यांचा सवाल. 

congress leader former cm ashok chavan speaks on are we free to express our views in country pdc | ­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण

­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण

Next
ठळक मुद्दे४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाण यांचा सवाल 

औरंगाबाद : लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी लेखक, साहित्यिक, विचारवंत यांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या या भूमिकेला बांधील राहण्याजोगे वातावरण सध्या देशात आहे का, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित केला. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या लोकसंवाद फाउंडेशन आयोजित मराठवाडा  साहित्य संमेलनाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार, मावळते अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, ‘मसाप’च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, मसापचे अध्यक्ष  कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे आदींची मंचावर उपस्थिती होती. 

उद्घाटक म्हणून बोलताना चव्हाण म्हणाले, साहित्यावर अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार नाही, मात्र साहित्य चळवळ रुजली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठी राजकीय व्यक्तींनी सहकार्य केले पाहिजे. मराठवाड्याचा सर्व विभागांत अनुशेष आहे. मात्र, साहित्यात समराठवाडा पुढारलेला आहे. 

राज्याचे पहिले सांस्कृतिक धोरण जाहीर करण्याचा योग माझ्याच कार्यकाळात आला. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा साहित्य, कला, संस्कृती  याविषयी आस्था बाळगून आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन साहित्य चळवळीचे प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ‘गोंदण’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. 

माणूसच लेखकांचा केंद्रबिंदू असावा
माणसाची सनातन सुख-दु:खे समान असली तरी काहीकाळ धर्म, जात, प्रांत, लिंग आणि वर्णभेदानुसार त्याची तीव्रता कमी-जास्त होत असते. लेखकाचा केंद्रबिंदू माणूस असल्यामुळे माणूस ज्या पर्यावरणात जगतो त्या पर्यावरणाचा विचार करणे लेखकाला अपरिहार्य ठरते, असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष कादंबरीकार बाबू बिरादार यांनी केले.

तो शब्द आणि हा शब्द... 
ठाले पाटील म्हणाले, ‘मसाप’चा जन्म नांदेड शहरात झाला. आजवर ही संस्था विस्तारली; पण जन्मभूमी असलेल्या नांदेडमध्ये हक्काचे कार्यालय अजून झाले नाही. याविषयी अशोकरावांना पाच वर्षांपूर्वी पत्र दिले, तेव्हा ते ‘करतो’ म्हणाले; पण अजूनही आम्हाला जागा मिळाली नाही. २००१ च्या मराठवाडा साहित्य संमेलनात दिवंगत नेते विलासराव देशमुख आले होते. तेव्हा फक्त भिंती उभ्या होत्या, पंखे नव्हते. घामाने आणि माझ्या भाषणाने विलासराव घामाघूम झाले. या संस्थेला काहीतरी अनुदान द्या, ही माझी मागणी होती. सध्या जशा बारा आमदारांच्या नियुक्त्या अडवून ठेवलेल्या आहेत, तसे बारा आमदार तेव्हा निवडून आले होते. त्यांच्या माध्यमातून विलासरावांनी तसेच शरद पवार, जयंत पाटील या नेत्यांनी या संस्थेला हातभार लावला. यावेळी १२ आमदारांचा मुद्दा काढताच सभागृह खळखळून हसले. 

ठाले पाटील इतके दिवस अध्यक्ष कसे? 
ठाले पाटील यांच्या वक्तव्याची अशोक चव्हाण यांनीही फिरकी घेतली.  आम्हाला मंत्रिमंडळात २० वर्षे टिकून राहणे शक्य होत नाही; मग ठाले पाटील २० वर्षांपासून मसापचे अध्यक्ष कसे राहिले, याचे मला आश्चर्य वाटते. ठाले पाटलांच्या भाषणानेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना घाम आला असेल; पण मला नाही आला. मी तुमच्या मागण्यांचा विचार करतो. सहा महिन्यांत नांदेडमध्ये मसापच्या कार्यालयाला जागा देऊ, असा शब्द चव्हाण यांनी दिला.

Web Title: congress leader former cm ashok chavan speaks on are we free to express our views in country pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app