"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 20:19 IST2025-08-12T19:28:49+5:302025-08-12T20:19:30+5:30
Raj Thackeray News: मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यास मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मोठं विधान केलं आहे.

"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
मराठीच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यातील सर्व मतभेद विसरून एकत्र आले होते. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटामधील युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यास मनसेचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मोठं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, त्या दोघांच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. राज ठाकरे अद्याप मविआत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की चर्चा करून काँग्रेस निर्णय घेईल, असे चेन्नीथला म्हणाले.
त्यांनी नवीन कार्यकारिणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नवीन चेहरे आहेत. काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम करा असे सांगून लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जिल्ह्या जिल्ह्यात मशाल मोर्चा काढा व सह्याची मोहीम राबवून राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या लढाईला शक्ती द्या असेही चेन्नीथला म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी हा प्रदेशाध्यक्षच आहे. जे गेले ते जाऊ द्या, गेले ते कावळे होते व राहिले ते मावळे आहेत आणि मी तुमच्या बरोबर आहे असे आश्वस्त करत दोन दिवसांची कार्यशाळा संपली असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. आता Action, action आणि action वरच भर द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय खेचून आणा व काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष करा, असे आवाहनही सपकाळ यांनी केले.