“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:42 IST2025-11-20T17:38:06+5:302025-11-20T17:42:40+5:30
Congress Harshwardhan Sapkal: मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
Congress Harshwardhan Sapkal: मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आघाडी करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. इंडिया आघाडी बाहेरचा पक्ष आघाडीत येणार असेल तर तसा प्रस्ताव सादर करावा त्यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय होईल. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्याचा अधिकार आहे, त्यांनी कोणाशी युती करावी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
मनसेच्या आरोपाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठी हा अस्मितेचा मुद्दा आहे, तो जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मराठी हा केवळ भाषेपुरता विषय नसून मराठी हा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्र धर्म काँग्रेसला कोणी शिकवण्याची गरज नाही. इयत्ता पहिल्यापासून हिंदी सक्ती करण्याचा मुद्दा पुढे आला त्यावेळी सर्वात आधी काँग्रेसने विरोध केला होता, याचे स्मरण यानिमित्ताने करुन देत आहोत असेही सपकाळ म्हणाले.
महायुतीने महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली, त्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असून महाराष्ट्रातील सर्व निर्णय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेतात. त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दोन दिवसापूर्वीच अमित शाह यांना भेटले होतो, त्यानंतर पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यातून क्लिन चिट देण्यात आली. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत टोळी युद्ध सुरू आहे आणि त्यातून नेहमी दिल्लीत जावे लागते, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे मोठे स्कँडल पुराव्यासह उघड केले आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असून हा विषय एकट्या काँग्रेस पक्षापुरता मर्यादीत नसून तो सर्वांचा आहे. राहुल गांधी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देत असून या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.