“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:03 IST2025-11-15T09:02:10+5:302025-11-15T09:03:02+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे. मतचोरी, बोगस मतदान आणि SIR च्या माध्यमातून विरोधकांचे मतदार वगळण्याने भाजपा व मित्रपक्षाचा विजय झाला आहे, असे म्हणत बचेंगे तो और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
प्रसार माध्य़मांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बिहारच्या निकालानंतर सत्ताधारी जे आरोप करत आहेत त्यात काहीही सत्य नाही ते निराधार आहेत. पाच वर्ष गरिब जनतेकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दिलेले १० हजार रुपये याचाही परिणाम झाला का, यावर चर्चा होईल. पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे हे पाहता हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. देशाला आता टी. एन. शेषन सारख्या निवडणूक आयुक्तांची गरज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
काँग्रेस व राज्यघटनेचा विचार एकच
ज्येष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजातील छोट्या छोट्या जातीकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. लहान घटकांना एकत्र करून संघटनेची ताकद वाढवा. काँग्रेस व राज्यघटनेचा विचार एकच आहे, हा विचार समतेचा आहे आणि आपल्या संत महंतानी जे सांगतिले तेच राज्य घटनेत आहे. देश सध्या एका संकटातून जात असून जो लढतो त्याचा इतिहास लिहिला जाते. आज राहुल गांधी देश, लोकशाही व राज्यघटना वाचवण्याची लढाई लढत आहेत या लढाईत सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन थोरात यांनी केले.
दरम्यान, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची नात गिरीजा पिचड यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. गिरीजा पिचड यांच्या रुपाने आदिवासी समाजाला एक नेतृत्व मिळाले असून त्या आदिवासी समाजाच्या न्याय हक्काची लढाई लढतील, असे सपकाळ यावेळी म्हणाले.