“लाचखोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी, काँग्रेस काळात...”; हर्षवर्धन सपकाळांची महायुतीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 16:47 IST2026-02-13T16:47:26+5:302026-02-13T16:47:26+5:30
Congress Harshwardhan Sapkal: मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

“लाचखोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी, काँग्रेस काळात...”; हर्षवर्धन सपकाळांची महायुतीवर टीका
Congress Harshwardhan Sapkal: राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालयातून भ्रष्टाचाराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर धाड टाकून अन्न व औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून थेट मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या कारवाईने राजकीय वातावरणही तापले आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली.
अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेला लिपिक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने जाळ्यात पकडले. एका तक्रारदाराचा मेडिकल परवाना निलंबित करण्यात आला होता. हा परवाना पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ढेरंगे याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर ३५ हजार रुपयांवर तडजोड झाली आणि ही रक्कम स्वीकारतानाच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई अधिक चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे नाट्य राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात घडले. एसीबीच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने झिरवाळ यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता. तपास पूर्ण होईपर्यंत कार्यालयाचे कामकाज थांबवण्यात आले होते.
लाचखोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेस सरकारच्या काळात लोकाभिमुख कारभार करण्यासाठी लोकांना सरकार आपले वाटावे यासाठी राज्य सरकारचे मुख्यालय असणाऱ्या सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय करण्यात आले. पण महाभ्रष्ट भाजपा महायुतीने मंत्रालयाचे भ्रष्टाचारालय केले आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे, हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली आहे मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.