Atul Londhe : "शिंदे-फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 18:38 IST2022-09-14T18:30:00+5:302022-09-14T18:38:37+5:30
Congress Atul Londhe : "शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत का मोदी शाह यांचे गुलाम आहेत? असा प्रश्न जनतेला पडला आहे."

Atul Londhe : "शिंदे-फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली"
मुंबई - एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने दोन लाख कोटी रुपयांचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत का मोदी शाह यांचे गुलाम आहेत? असा प्रश्न जनतेला पडला आहे. एक लाख रोजगार देणारा फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणला नाही तर बेरोजगार तरुणांसाठी काँग्रेस पक्ष राज्यात मोठे आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Congress Atul Londhe) यांनी दिला आहे.
गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगाव येथे प्रस्तावित होता, तळेगावची जागा रस्ते, पाणी, विमानसेवा, बंदर, हवामान यासह सर्व पायाभूत सोयी असलेली जागा आहे. सेमी कंडक्टर बनवण्यासाठी तळगावचे हवामानही योग्य आहे याउलट गुजरातमधील धोलेरा हे ठिकाण या प्रकल्पासाठी कुठल्याचदृष्टीने योग्य नाही, असे असतानाही हा प्रकल्प तेथे जाऊच कसा शकतो हा महत्वाचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातची दलाली करून महाराष्ट्राशी केलेली गद्दारी कदापी सहन केली जाणार नाही. मुख्यमंत्री शिंदे स्वतःच मोदी-शाह यांचे एजंट आहेत असे म्हणाले होते म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्वतः गुजरातचा एजंट होऊन महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला देऊन टाकतो काय?
सरकारमधील लोकांना ५० खोके मिळाल्याची चर्चा आहे, त्यामुळे ते ओके आहेत पण महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची गरज आहे, त्यांना कोणी खोके देणार नाही. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंचे नाव घेऊन मोदी-शाह यांची गुलामगिरी करायची हे ईडी सरकारचे धोरण दिसत आहे.
महाराष्ट्राला लवकरच दुसरा मोठा प्रकल्प मिळणार आहे असा दावा उद्योगमंत्री करत आहेत पण हे गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. यात आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की, २७ जुलै २०२२ रोजी फॉक्सकॉनच्या अधिकारी व शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली त्यावेळी हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते मग त्यानंतर असे काय घडले की हा प्रकल्प गुजरातला गेला हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांचे वॉररूम आहेत पण या दोघांच्या वादात महाराष्ट्राचे नुकसान होत आहे हे दुर्दैवी आहे असेही लोंढे म्हणाले.