काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:19 IST2025-10-07T09:18:32+5:302025-10-07T09:19:56+5:30
ज्या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राज्यात सुरू आहे. ही युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूला घेण्याची आवश्यकता नाही असं विधान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. त्यामुळे मनसेच्यामहाविकास आघाडीत समावेशावर प्रश्चचिन्ह निर्माण झालं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, इंडिया आघाडीच्या वाटाघाटी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर होणार आहेत. जिल्हा आणि ब्लॉक त्याशिवाय तिथले जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष युतीबाबत निर्णय घेणार आहेत. त्यांच्या निर्णयावर आम्ही सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत. त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीलाही नाही असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं. त्यामुळे ज्या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राज्यात सुरू आहे. ही युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्ही कुठे युतीसाठी तुमच्याकडे आलोय - मनसे
तर युतीसाठी तुमच्याकडे कोण आले होते, त्यांच्याकडे आमच्यापैकी कुणी गेले नव्हते त्यामुळे त्यांच्यावर भाष्य करण्याची गरज नाही. आमच्या पक्षाला काय वाटते ते आमचे अध्यक्ष राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. सध्या ज्या काही चर्चा असतील त्या माध्यमांत सुरू आहे. ज्या भेटीगाठी आहेत, त्या कौटुंबिक आहेत. राजकीय झाल्या नाहीत. आमच्या पक्षाकडून जो काही निर्णय असेल तो राज ठाकरेच घेतील. बाकीच्या पक्षांचे त्यांचे त्यांना लखलाभ असो. जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आमच्या पक्षाकडून तो केवळ राज ठाकरे घेतील. आम्ही महाराष्ट्रसैनिक आहोत, आम्हाला जो काही आदेश येईल त्यावर आम्ही काम करू असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं.
दरम्यान, काँग्रेस स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे. ते मविआचे घटक आहे. स्थानिक पातळीवर युतीबाबत चर्चा होणार आहे. काही विभागात युती होऊ शकते, काही नाही. ठाण्यात कदाचित काँग्रेसची वेगळी भूमिका असेल. स्थानिक स्तरावर युती झाली नाही तर कुणासोबत जायचे अथवा नाही हे त्या त्या पक्षाचा निर्णय असेल. मविआचे घटक पक्ष चर्चेला बसतील तेव्हा हे विषय चर्चेत येतील. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या ठिकाणी मनसेसोबत युतीचा आमचा प्रयत्न आहे असं उद्धवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी सांगितले.