राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:58 IST2025-08-08T15:57:40+5:302025-08-08T15:58:43+5:30

निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अशी मागणी काँग्रेसने केली.

Congress aggressive after Rahul Gandhi's allegation on ECI Voters Scam; Road blockade in Dadar, slogans raised against BJP | राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी

राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी

मुंबई -  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी केली असा आरोप केला. राहुल यांच्या आरोपानंतर देशात खळबळ माजली. आता या आरोपानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये रास्ता रोको करत निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास तासभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनाआधी पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग व भाजपाचा खरपूस समाचार घेतला. राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला. उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम १७/१८/१९ नुसार ताबडतोब चौकशी करावी असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? असा सवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. 

देवेंद्र फडणवीस ‘चीप मिनिस्टर’

दरम्यान, निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे. या अहंकराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चीफ मिनिस्टर’ नाही चर ‘चीप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. 

Web Title: Congress aggressive after Rahul Gandhi's allegation on ECI Voters Scam; Road blockade in Dadar, slogans raised against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.