एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात व्हायरल मेसेजमुळ गोंधळ, पडळकर-खोतांच्या भूमिकेवर संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:42 IST2021-11-24T12:41:32+5:302021-11-24T12:42:28+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात संप सुरू आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात व्हायरल मेसेजमुळ गोंधळ, पडळकर-खोतांच्या भूमिकेवर संशय
मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी आझाद मैदानात एक नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसोबत हे दोन्ही नेते उपस्थित होते. पण, एका व्हायरल मेसेजमुळं या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर संशयाचे वातावरण निर्माण झाले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. व्हायरल मेसेजमध्ये हे दोन्ही नेते मॅनेज झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तुमचा विश्वास नसेल तर आम्ही घरी जातो, असं यावेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितलं. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी खोत व पडळकर यांना अडवलं आणि त्यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एका व्हायरल मेसेजमुळे पडळकर आणि खोत यांच्यावर संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता सर्व प्रकरण शांत झालं आहे.
एसटीच्या संपाबाबात महत्वाची बैठक
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णय़ावर एसटी कर्मचा-यांचं म्हणणं काय आहे, याचा निर्णय आज सकाळी एसटी कर्मचारी घेणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी कर्मचाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटीचे कर्मचारी उपस्थित आहेत. या बैठकीत संपाबाबत महत्वाचा निर्णय होऊ शकते.