शेती नसलेल्यानाही दिली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, २५ कोटी रुपये लाटले, अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:34 IST2026-02-05T13:30:47+5:302026-02-05T13:34:41+5:30
Jalna Crime News: धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. येथे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

शेती नसलेल्यानाही दिली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, २५ कोटी रुपये लाटले, अधिकारी अटकेत
सरकारी विभागांमधील भ्रष्टाचार, विविध सरकारी योजनांमध्ये सरकारी ‘बाबू’ लोकांकडून होणारे गैरव्यवहार या गोष्टी आता नव्या राहिलेल्या नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. येथे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आशिष प्रमोदकुमार पैठणकर असं या आरोपीचं नाव असून, तो घनसावंगी तहसील कार्यालयामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होता. जालना येथील आर्थिक क्राईम ब्रँचने त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
अंबड आणि घनसावंगी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणाच नुकसान झालं होतं. त्यानंतर सरकारने चार वेगवेगळ्या निर्णयांमधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा केली होती. मात्र काही सरकारी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून अनुदानाच्या यादीत अनेक बनावट लाभार्थ्यांची नावं घुसवली. धक्कादायक बाब म्हणजे या लाभार्थ्यांच्या नावावर कुटलीही शेतजमीन नव्हती.
या बनावट नावांच्या आधारावर मिळालेली सरकारी नुकसान भरपाईची रक्कम आरोपींनी स्वत:च काढून घेत सरकारचे सुमारे २४.९० कोटी रुपये लाटले. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला तक्रार मिळाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी तीन सदस्यांची तपास समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालामधून मोठ्या प्रमाणावर सरकारी पैशाची अफरातफर झाल्याचे समोर आले.
त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यामध्ये २२ तलाठी, तहसील कार्यालयामधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ५ कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील १ कर्मचारी असे मिळून एकूण २८ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष पैठणकर गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता. तसेच तो अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होता. याचदरम्यान, तो जालना येथे येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर त्याच्या ठिकाणाचा छडा लावत त्याला अटक केली. आतापर्यंत या प्रकरणामध्ये एकूण ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ३ आरोपी अद्यापही फरार आहेत.