Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:10 IST2025-02-07T11:10:14+5:302025-02-07T11:10:55+5:30
Majhi Ladki Bahin Yojana:: डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली.

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय?
Majhi Ladki Bahin Yojana: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात आणली. या योजनेच्या माध्यमातून महायुतीने जोरदार प्रचार करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र निकालानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेवरून बरीच चर्चा सुरू आहे. नुकतेच महिला विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा तब्बल ५ लाखांनी कमी आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर या योजनेचा फेर आढावा घेण्यात आला. त्यातून अपात्र असणाऱ्या महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली. लाडकी बहीण योजनेतून कमी झालेल्या ५ लाख बहिणींपैकी अनेकांचे वय ६५ वर्षाहून अधिक झाल्यानं त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेतील अटीनुसार २१ ते ६५ वयोगटातीलच महिलांना महिन्याला १५०० रूपये देण्यात येतात.
काय कारणे आहेत?
दीड लाख बहिणींचे वय ६५ हून अधिक झाले, योजनेच्या अटीनुसार ६५ वर्षापर्यंतच योजनेचा लाभ घेता येतो
२ लाख लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेतात.
पुढील काळात नमो महिला सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी बहिणींनाही योजनेतून वगळणार असल्याची माहिती
अडीच कोटींचा आकडा ३० लाखांवर आणणार, विरोधकांचा दावा
लाडक्या बहिणीचा अडीच कोटी पर्यंत गेलेला आकडा पंचवीस ते तीस लाखावर आणण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. जाहिराती देऊन लाडक्या बहिणींची दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान घेण्याचा हा फंडा आहे असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, योजनेतील नियमाप्रमाणे ६५ वर्षावरील बहिणींना लाभ मिळू शकत नाही. घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अनावधानाने किंवा नजरचुकीने या महिला योजनेत समाविष्ट झाल्या असतील तर त्या कमी झाल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.