‘मुंबई’ला सर्वसाधारण विजेतेपद

By Admin | Published: February 15, 2017 01:27 AM2017-02-15T01:27:01+5:302017-02-15T01:27:01+5:30

जल्लोषात ‘शिवोत्सव’चा समारोप : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला उपविजेतेपद

Commonwealth Games for Mumbai | ‘मुंबई’ला सर्वसाधारण विजेतेपद

‘मुंबई’ला सर्वसाधारण विजेतेपद

googlenewsNext

कोल्हापूर : कलाप्रकारांच्या दमदार सादरीकरणाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाने ३२ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय ‘शिवोत्सव’ युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद मंगळवारी पटकाविले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ उपविजेते ठरले. यजमान शिवाजी विद्यापीठाला शोभायात्रेतील उत्कृष्ट सादरीकरणाबाबत चौथा क्रमांक मिळाला. विविध कलाप्रकारांत महाराष्ट्रातील विद्यापीठांनी यश मिळवत बाजी मारली. गेल्या पाच दिवसांपासून शिवाजी विद्यापीठात रंगलेल्या, तरुणाईच्या कलाविष्काराने बहरलेल्या युवा महोत्सवाचा जल्लोषी वातावरणात समारोप झाला.
विद्यापीठाच्या लोककला केंद्रातील समारोपाच्या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. डी. आर. मोरे, तर भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) महोत्सव निरीक्षक एस. के. शर्मा, सहसचिव डेव्हिड सॅम्पसन, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, भारती विद्यापीठाचे हणमंतराव कदम प्रमुख उपस्थित होते. यावेळी निरीक्षक शर्मा म्हणाले, ‘कलानगरी’ कोल्हापुरात कला सादरीकरणाचे देशभरातील तरुणाईला भाग्य लाभले. महोत्सवातील निकालात मानांकन पद्धती लागू करण्याचा प्रस्ताव ‘एआययू’ला सादर करणार आहे. कार्यक्रमात तेजपूर विद्यापीठाच्या भूपाली कश्यप, मुंबई विद्यापीठाचे नीलेश सावे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, आदी उपस्थित होते.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी निकाल वाचन केले. दरम्यान, महोत्सवातील सर्वसाधारण विजेतेपदाच्या गटात अमृतसरची गुरुनानक युनिव्हर्सिटी तृतीय, तर पंजाबची लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने चौथा क्रमांक मिळविला. शोभायात्रेत आंध्र प्रदेशच्या कृष्णा युनिव्हर्सिटीने प्रथम, आसामच्या गुवाहाटी युनिव्हर्सिटीने द्वितीय, हरियाणाच्या कुरुक्षेत्र विद्यापीठाने तृतीय क्रमांक मिळविला. यजमान शिवाजी विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी आॅफ म्हैसूरला चौथा क्रमांक विभागून दिला. विजेत्या संघांतील कलाकारांनी लोककला केंद्राच्या परिसरात नृत्याचा फेर धरत जल्लोष केला. काहींनी विजेतेपदासमवेत ‘सेल्फी’ घेत आनंद साजरा केला. (प्रतिनिधी)


महाराष्ट्रातील विद्यापीठांची बाजी
महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांनी विविध कलाप्रकारांत यश मिळवत बाजी मारली. त्यात भारती विद्यापीठ (शास्त्रीय गायन एकल, तालवाद्य व सुगम गायन प्रथम), मुंबई विद्यापीठ (शास्त्रीय गायन, लोकवाद्यवृंद, कोलाज व पोस्टर मेकिंग प्रथम, तालवाद्य, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य समूहगीत द्वितीय, एकांकिका व व्यंगचित्रे तृतीय), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (शास्त्रीय गायन एकल द्वितीय, एकांकिका, नकला व व्यंगचित्र चतुर्थ), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (सूरवाद्य, तालवाद्य द्वितीय), एसएनडीटी महिला विद्यापीठ (सुगम गायन, भारतीय समूहगीत गायन प्रथम, पाश्चिमात्य समूहगीत व मातीकाम तृतीय, एकांकिका चतुर्थ, मूकनाट्य द्वितीय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (सुगम गायन, लघुनाटिका, नकला व मातीकाम द्वितीय), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (पाश्चिमात्य गायन, लोकवाद्यवृंद तृतीय, भारतीय समूहगीत, पाश्चिमात्य समूहगीत, कोलाज, लोकनृत्य, वक्तृत्व व वाद-विवाद द्वितीय, शास्त्रीय नृत्य चतुर्थ, मातीकाम प्रथम), शिवाजी विद्यापीठ (मूकनाट्य चतुर्थ, स्थळ छायाचित्रण प्रथम). सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (स्थळचित्रण चतुर्थ). सोलापूर विद्यापीठ (पोस्टर मेकिंग तृतीय, मांडणी द्वितीय).


कलाप्रकारनिहाय विजेतेपद
संगीत (अनुक्रमे विजेते, उपविजेते) : गुरू नानक देव युनिव्हर्सिटी, मुंबई विद्यापीठ. नृत्य : मणिपूर युनिव्हर्सिटी, कुरूक्षेत्र विद्यापीठ. साहित्य : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गुवाहाटी युनिव्हर्सिटी. नाट्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई.
ललित कला : मुंबई विद्यापीठ, गुलबर्गा युनिव्हर्सिटी कर्नाटक.

Web Title: Commonwealth Games for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.