कमबॅक हा सेटबॅकपेक्षा शक्तिशाली; मनसे नेते बाळा नांदगावकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:10 IST2026-03-20T11:09:43+5:302026-03-20T11:10:42+5:30
२० व्या गुढीपाडवा मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

कमबॅक हा सेटबॅकपेक्षा शक्तिशाली; मनसे नेते बाळा नांदगावकर
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मराठी माणूस, राज्यावर प्रेम करणारा एकमेव नेता आणि राजकारणाचा धुरंधर एकच आहे, तो म्हणजे राज ठाकरे, असे मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
मनसेचा २०वा गुढीपाडवा मेळावा गुरुवारी शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी तुम्ही संयम बाळगलात आणि तुमचे कम बॅक होणार. कम बॅक हा सेट बॅकपेक्षा खूप शक्तिशाली असतो, असे ते म्हणाले.
दप्तराचे ओझे कमी करा
राज ठाकरे यांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. सत्ता कोणाचीही असली तरी सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच, ते म्हणजे राज ठाकरे, असे सांगत, येणारा काळ १०० टक्के राज ठाकरे यांचा आहे, असे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी मुलांच्या दप्तराच्या ओझ्याचा विषय मांडताना हे ओझे कमी करण्याची मागणी केली. प्रिंटर लॉबीच्या दबावामुळे ओझे मुलांना सोसावे लागत आहे, असा आरोपही केला. राजकारणाची बजबजपुरी झाल्याने तरुणांनी याकडे पाठ फिरवली, असे मत मनोज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कर्णावतीनगर कधी होणार?
२० वर्षांपूर्वी मेळावा या मैदानात बसून ऐकत होतो. आज या व्यासपीठावर भाषण करत आहे, हे फक्त राज ठाकरे हेच करू शकतात, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. महाराष्ट्राला कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण केले, अहमदनगरचे अहिल्यानगर केले, असे सांगून अहमदाबादचे कर्णावतीनगर कधी होणार ? असा सवाल त्यांनी केला.
विदर्भातून ७ हजार कार्यकर्ते
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले होते. सुमारे ७ हजार कार्यकर्ते विदर्भातून
आले होते.
सभास्थळाची क्षणचित्रे
सभास्थळी येणाऱ्या चौकात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देणारे अनेक बॅनर्स लागले होते. मात्र, त्यातील एक बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. ‘१९ मार्च २००६ - स्वतःला महाराष्ट्राला अर्पण...१९ मार्च २०२६ - हा नुसता योगायोग नाही, तर हा इतिहासाच्या नियतीचा संकेत आहे’, असे त्यावर लिहिले होते. मनसेची पक्ष स्थापनेनंतरची पहिली जाहीर सभा याच मैदानात १९ मार्च २००६ या दिवशी झाली होती. त्यानंतर दरवर्षी गुढी पाडव्याला वेगवेगळ्या तारखेला ही सभा होते. आज योगायोगाने पहिल्या सभेची तारीख आणि आजचा गुढी पाडवा १९ मार्च, हा योगायोग जुळून आला आहे.
मेळाव्यासाठीच्या व्यासपीठ पूर्णपणे झेंडूच्या फुलांनी सजवलेले होते, तर दोन्ही बाजूला प्रतिकात्मक भव्य गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.