'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 14:29 IST2025-11-23T14:25:50+5:302025-11-23T14:29:30+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम

'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
CM Devendra Fadnavis: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील फोडाफोडीचे आणि कुरघोडीचे राजकारण चांगलेच तापले असताना, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांतील संबंध कमालीचे बिघडल्याचे पाहायला मिळत आहेत. या फोडाफोडीची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही दुरावा निर्माण झाल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून दिसत होतं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देताना तशी कुठलीही परिस्थिती नसल्याचे म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मित्रपक्षांमध्येच सुरू असलेल्या नेत्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाची तक्रार केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा आल्याचे म्हटलं जात होतं. बिहारच्या शपथविधीच्या कार्यक्रमादरम्यानही या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून त्यांच्यातील नाराजी उघडपणे दिसून आली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न केल्याने, महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळील एका कार्यक्रमातही शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना अभिवादन केले आणि लगेच दोघेही बाजूला झाले.
मात्र आता सगळ्या वाढत्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही.
"हा वेड्यांचा बाजार सुरु आहे आणि यामध्ये काही माध्यमे वेडी झाली आहेत. त्यामुळे परवा जेव्हा मी आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी हुतात्मा स्मारकावर गेलो तेव्हा आल्यावर आणि जाताना आम्ही भेटलो. ते कुठे जातायत हे त्यांनी सांगितले आणि मी कुठे जातोय हे त्यांना सांगितले. त्यातून काही गोष्टी क्लिक करुन बोललो नाही असं दाखवलं गेलं. कालच्याही कार्यक्रमात आमच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याचे ठरले होते. तिथे आल्यावर, स्टेजवर आणि जातानाही आम्ही भेटलो. कारण न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही. तुम्ही दाखवताय तशी कुठलीही परिस्थिती नाही. जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.