पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 20:11 IST2025-04-28T20:04:39+5:302025-04-28T20:11:06+5:30
soil and water conservation, Maharashtra Goverment: महामंडळांतर्गत कामांच्या आढाव्यासाठी सचिवस्तरीय समिती

पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
soil and water conservation, Maharashtra Goverment: राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये 'माथा ते पायथा' तत्त्वानुसार आणि पाण्याच्या लेखाजोखाच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी व योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामे हाती घेण्याचे धोरण राबवावे. मृदा व जलसंधारण विभागाने संपूर्ण राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC) व भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था (GSDA) यांच्या पाणलोट नकाशाच्या सहाय्याने तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे जलसंधारण महामंडळ आढावा बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
🔸 CM Devendra Fadnavis chaired a review meeting of 'Maharashtra Water Conservation Corporation'
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2025
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र जलसंधारण महामंडळा'ची आढावा बैठक
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'महाराष्ट्र जल संरक्षण महामंडल' की… pic.twitter.com/3pbn6ulGAp
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "विभागाने जलसंधारणावर ५० टक्के निधी खर्च करावा. जलसंधारण महामंडळातील सध्याच्या अपूर्ण व नवीन प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यासाठी सचिव वित्त, सचिव नियोजन व सचिव मृद व जलसंधारण यांची एक समिती तयार करावी. भू-संपादन व वनजमीन अधिग्रहण आवश्यक असलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येऊ नये, अत्यंत गरजेच्या प्रकल्पांसाठी उच्चस्तरीय समितीकडून मान्यता घेणे बंधनकारक राहील."
"महामंडळाचे संकेतस्थळ तयार करावे तसेच कामकाज सुलभ करण्यासाठी डॅशबोर्ड ही तयार करावा. महामंडळाने सरसकट द्वारयुक्त किंवा विना-द्वार सिमेंट नाला बंधारे (Gated/Non-Gated CNB) बांधण्याऐवजी भूजल पुनर्भरणासाठी विशेष बांधकामे करावीत. राज्यस्तरावर उपलब्ध भूगर्भीय माहितीचा वापर करून अंदाजपत्रकात चुका होऊ नयेत यावर भर देण्यात यावा. यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल", असेही मुख्यमंत्री म्हणाले.
"गुगल इन्कॉर्पोरेशनसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार मृद व जलसंधारण विभागास तांत्रिक सहाय्य करावे. दोन कोटीवरील कामासाठी दक्षता व गुणनियंत्रण तपासणी बंधनकारक करुन या कामाची तपासणी पूर्ण झाल्याखेरीज अंतिम २० टक्के देयक अदा करू नये," असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.